पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/118

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 वि. स. खांडेकरांच्या या पुनर्शोधात त्यांची जीवन व साहित्यविषयक अनेक साधने, छायाचित्रे, हस्तलिखिते माझ्या हाती आली. खांडेकर कुटुंबीयांनी पद्मभूषण, ज्ञानपीठ, साहित्य अकादमी पुरस्कार, सन्मानपत्रे, मानपत्रे इत्यादी मूळ मौल्यवान वस्तू भेट दिल्या. त्यातून भारतातलं साहित्यिकाचं पहिलं शास्त्रोक्त स्मृती संग्रहालय शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या सहकार्यानं तिथंच उभारण्यात आलं आहे. एखाद्या विद्यापीठाने निर्मिलेलं हे साहित्यिकाचं पहिलं स्मृतिसंग्रहालय असावं. इथे कान कोरण्यापासून कर्ण्यापर्यंत लेखकाच्या वापरातील सर्व वस्तू आपणास पाहण्यास मिळतात. जन्मकुंडली ते मृत्यू असा एका लेखकाचा सजीवप्रवास अनुभवण्यासाठी प्रत्येक साहित्यप्रेमींने हे संग्रहालय पाहिलंच पाहिजे. त्याची एक-दोन उदाहरणं पुरेशी ठरावीत. भारताच्या नियोजन मंडळाचे सदस्य असताना डॉ. भालचंद्र मुणगेकर हे संग्रहालय पाहण्यास आले होते. संग्रहालयात खांडेकरांचे भाषण त्यांच्याच आवाजात ऐकवले गेले... ते ऐकत ओक्साबोक्शी रडत राहिले. कवी ग्रेस पाहण्यास आले होते... भावुक झाले. मला म्हणाले, “यार, क्या हमारी कब्र भी ऐसे शानो-शौकत के काबील होगी?" आणि कितीतरी वेळ नंतर डोळे मिटून त्यांचे मौन... मोठे बोलके होते. तिथली लेखकाची पडवी पाहत असताना असे वाटते की, आत्ताच खांडेकर काही लिहून उठून गेले असावेत. संग्रहालयाचा प्रवेशापासून ते शेवटपर्यंतचा प्रत्येक क्षण म्हणजे खांडेकर युगाची अनुभूती. समग्र छायाचित्रे, पुस्तके, पदव्या, मार्क्सलिस्ट, मस्टर, रेल्वे तिकिटं, इन्कम टॅक्स रिटर्न, चेकबुक, विमा पावत्या, स्मृती तिकिटें, भेटवस्तु, चित्रपट छायाचित्रे, हस्ताक्षरे ,वाचलेली, खुणा केलेली वर्तमानपत्रे, वह्या, पुस्तके, खर्डे पाहणं म्हणजे लेखक शेजारीच असल्याचा भास! शेक्सपियरचे स्मृती स्मारक ज्यांनी ज्यांनी पाहिले, त्यांना इथे त्याची हटकून आठवण येते! कोल्हापूर आता संग्रहालयाची नगरी झालीय! त्यात हे न चुकता पाहावे असे आधुनिक संग्रहालय! याचे महत्त्व अशासाठी की, हे पाहिलेल्या विद्यार्थ्यांना वाटतं की आपण लेखक झाले पाहिजे. मोठ्यांना रुखरुख लागते, आपण लेखक झालो असतो तर...' हेच या संग्रहालयाचं यश!

 मराठी भाषा आणि साहित्याच्या प्रांतात एका लेखकाचे सारे लेखन ग्रंथबद्ध होणे, त्याच्या समग्र साहित्याचे संशोधन होणे, त्याच्या अधिकांश साहित्याची भाषांतरे... तीही विविध भाषांत होणे, संपूर्ण संग्रहालय उभारणे, त्याला राष्ट्रीय मान-सन्मान लाभणे यातच त्या लेखकाचं थोरपण दिसून येते. हे वर्ष यशवंतराव चव्हाण यांचे शताब्दी वर्ष आहे.

वि. स. खांडेकर चरित्र/११७