पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/117

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 वि. स. खांडेकर भारतीय साहित्यिक जसे होते, तसे भारतीय पटकथाकारही ! त्यांनी मराठी १४, हिंदी १०, तमिळ २, तेलगू २ अशा तब्बल २८ चित्रपटांसाठी पटकथा लिहून मराठी साहित्यिकांत एक कीर्तिमान स्थान स्थापित केलं आहे. या पटकथांचा संग्रह ‘अंतरीचा दिवा' नुकताच प्रकाशित झाला आहे. तो वाचताना आपल्या लक्षात येते की, खांडेकर गंभीर सामाजिक पटकथा जशा लिहीत तशा विनोदीही! चिं. वि. जोशींचा ‘चिमणराव' आणि 'गुंड्याभाऊ' खांडेकरांनी ‘सरकारी पाहुणे'व'लग्न पाहावे करून'सारख्या चित्रपटांतून मराठी मनात चिरंजीव केला. त्यांच्या ‘माझं बाळ' चित्रपटाने कुमारी माता व त्यांच्या मुलांना सामाजिक न्याय तरी दिलाच; पण महर्षी धोंडो केशव कर्वे यांना 'भारतरत्न' मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. याच चित्रपटात मंगेशकर भावंडं बाल अभिनेते म्हणून पडद्यावर आली. दानापानी, सुभद्रा, विश्वामित्र, बड़ी माँ हे गाजलेले हिंदी चित्रपट. त्यांच्या पटकथा खांडेकरांनी लिहिल्या होत्या, हे ऐकून सर्वांना आश्चर्य वाटतं; कारण खांडेकरांच्या चित्रपटसृष्टीतील कार्यकर्तृत्वाचा इतिहास आजवर झाकोळलेलाच राहिला होता. तो ‘अंतरीचा दिवा'मुळे प्रथमच प्रकाशात आला. यातील मराठी-हिंदी चित्रपट अधिकांशतः मास्टर विनायक व बाबूराव पेंढारकर यांच्या निर्मिती, दिग्दर्शन व अभिनयामुळे एक नवे पर्व निर्माण करून गेले. आज मराठी चित्रपटसृष्टीची शताब्दी साजरी होत असताना त्याचे ऐतिहासिक मोल महत्त्वाचे ठरले. खांडेकरांच्या साहित्याने जशी पिढी घडवली, तसेच या चित्रपटांनी मराठी प्रेक्षकांची अभिरुची सुसंस्कृत केली. खांडेकरांनी पटकथांबरोबर चित्रपटसंवाद,चित्रपट गीतेही लिहिली. चित्रीकरणासाठी आवश्यक दृश्यनिहाय कथालेखन, फ्रेम साठी आवश्यक Cut, inter-cut, Quick Disolve, mix, Fed out, fed in चे तंत्र खांडेकरांना चांगले अवगत होते. भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिले सिने पारितोषिक ‘गोहर मेडल' खांडेकरांच्या पहिल्या ‘छाया' पटकथेस लाभले होते, यावरूनही हे स्पष्ट होते. हृदयनाथ मंगेशकर चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात आले ते खांडेकरांची ‘अंतरीचा दिवा' पटकथा घेऊनच. खांडेकरांचे चित्रपट प्रेक्षकांना भावविकल करीत असत. चित्रपटगृहात तिकिटांबरोबरच खांडेकरांच्या पटकथेच्या कादंबऱ्याही विकल्या जात. हे वैभव लाभलेले खांडेकर हे मराठीतील एकमेव साहित्यिक होत.

वि. स. खांडेकर चरित्र/११६