पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/11

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दैनिक, नियतकालिकांचे वाचनही नियमित होते. चतुरस्त्र वाचनामुळे लेखनाची ऊर्मी होणे स्वाभाविक होते.
शिक्षण
 सन १९०७ मध्ये सांगली हायस्कूलमध्ये इंग्रजी पहिलीत प्रवेश घेतल्यापासून त्याच्या शालेय प्रगतीत उत्तरोत्तर वाढच होत गेली. शाळेतील शिक्षक श्रीपादशास्त्री देवधर, शंकरशेठ केळकर, मुदगल गुरुजी यांचा त्याच्यावर लोभ होता नि वरदहस्तही. मॅट्रिकमध्ये असताना रा. ना. जोशी, गो. वा. केळकर, ब. रा. कुलकर्णी हे त्याचे वर्गमित्र होते. त्यावेळी सांगलीला मॅट्रिकचे केंद्र नसल्यामुळे आपल्या वर्गसोबत्यांबरोबर त्याने बेळगाव केंद्र निवडले. त्याचे चुलत मामा वासूनाना त्या वेळी बेळगाव-शहापूर संस्थानात होते. ते केंद्र निवडण्याचे हेही एक कारण होतं.
 त्या वेळी शाळा जानेवारीत सुरू होत. परीक्षांचे निकाल डिसेंबरमध्ये लागत. डिसेंबर, १९१३ च्या शेवटच्या आठवड्यात मॅट्रिकचा निकाल लागला. गणेश आत्माराम खांडेकर अहमदाबाद, बेळगाव व मुंबई केंद्रांमधून उत्तीर्ण विद्यार्थ्यांत बाराव्या क्रमांकात अव्वल आला. महाराष्ट्रातील (मुंबई इलाखा)विद्यार्थ्यांत तो आठवा होता. त्याला ५७५ पैकी ४०३ गुण मिळाले होते. तो मॅट्रिकला जाताच घरच्या मामांनी त्याला परीक्षा संपताच पोस्टात चिकटवायची खलबते सुरू केली असल्याने उच्च शिक्षणाबद्दल इच्छा असूनही तो साशंकच असायचा; पण मोठा भाऊ बळवंत त्याच्यापूर्वी मॅट्रिक होऊन पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात शिकण्यासाठी गेला असल्याने आशा होती. मॅट्रिकचे वर्ष गणेशच्या दृष्टीने धकाधकीचे होते. वडिलांच्या जाण्याने आजोबा, मामांवर सारी भिस्त होती. दुपारचे जेवण देवळात असायचे. आजोबांच्या बदली जेवणाने शाळेला उशीर व्हायचा. रात्री कधी-कधी पोह्यांवरच निभवायला लागायचे. वडिलांच्या जाण्याने आलेलं पोरकेपण, फाटके कपडे, फी न मिळणं, पुस्तके दुरापास्त. गणेश घरी मदत व्हावी म्हणून संस्कृत, गणिताच्या शिकवण्या करायचा. रुपये-आठ आणे मिळकत; पण ती मोठी वाटायचे ते दिवस! अशा दिव्यातून त्याचं मॅट्रिकला मिळालेले यश वाखाणण्यासारखे होते. दुःखं विसरायचा एकच उपाय होता - वाचन आणि अभ्यास. त्यातून वेळ मिळाला की, कृष्णाकाठी जाऊन तो एकांत संवाद अनुभवायचा.

 निकाल लागला तेव्हा गणेश वासूनानांकडे बेळगावला होता. सांगलीहून वकील झालेल्या चुलत मामा विनुदादाचे पत्र आलं. त्यात फर्ग्युसनला पाठवायची आनंदाची बातमी होती. त्या पत्राने गणेशच्या मनात स्वप्नांची

वि. स. खांडेकर चरित्र/१०