पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/108

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्या वेळी वि. स. खांडेकरांनी हृद्य भाषण केले होते. सत्कारास उत्तर देताना लता मंगेशकर यांनी कोल्हापूर, मास्टर विनायक, वि. स. खांडेकर यांचे ऋण व्यक्त करीत एक अविस्मरणीय, कृतज्ञतापूर्वक भाषण केलं होतं. ते भाषण त्यांच्या गाण्याइतकंच सुरेल होतं.
 सन १९५३ ला आचार्य अत्रे यांनी 'श्यामची आई' चित्रपट काढला. त्या चित्रपटास सुवर्णपदक मिळालं होतं. कोल्हापूरच्या बिंदू चौकात आचार्य अत्रे यांचा जाहीर सत्कार भाई माधवराव बागल यांच्या नेतृत्वाखाली झाला. त्याचे अध्यक्षपद वि. स. खांडेकरांकडे होते. वि. स. खांडेकर आणि आचार्य अत्रे यांनी हंस, प्रफुल्ल, नवयुग, इत्यादी चित्रपट कंपन्यांसाठी आलटून-पालटून पटकथा लिहिल्या होत्या. त्यामुळे अत्रे आणि खांडेकरांमध्ये मैत्र होते. त्याची जाहीर प्रचिती कोल्हापूरकरांनी अनुभवली होती.
 असाच एक प्रसंग आठवतो. चित्रमहर्षी भालजी पेंढारकर यांचा अमृतमहोत्सवी जंगी सत्कार करायचा म्हणून चित्रपटसृष्टीतील सर्व कलाकार, तंत्रज्ञ, एक झाले. भालजींनी या सत्कारास विनम्रपणे, कृतज्ञतापूर्ण नकार दिला; पण पंचाहत्तरावा वाढदिवस अगदी साधेपणाने साजरा केला. त्या दिवशी त्यांनी पाच ज्येष्ठांचा आदरपूर्वक सत्कार करून, त्यांचे आशीर्वाद घेऊन वाढदिवस साजरा केला. त्या ज्येष्ठांत वि. स. खांडेकर एक होते.
 आज कोल्हापूरला चित्रपट, कला, साहित्य, संगीत, शिक्षणाचा जो समृद्ध वारसा लाभला आहे, त्यात वि. स. खांडेकरांचं योगदान अविस्मरणीय असं राहिलं आहे. आज कोल्हापूरला साहित्यिकांची जी मोठी परंपरा दिसते, तिचा पाया वि. स. खांडेकरांनी आपल्य ध्येयशील साहित्यातून घातला आहे. वि. स. खांडेकर माणूस, साहित्यिक, समीक्षक म्हणून स्वागतशील होते. त्यातून अनेक साहित्यिकांना प्रोत्साहन, प्रेरणा मिळाली आहे.

 | आज लोक कोल्हापूरची आठवण, स्मरण ज्या अनेक गोष्टींसाठी करतात, त्यात एक कृतज्ञ स्मरण वि. स. खांडेकरांचे असते. कोल्हापूरने वि. स. खांडेकरांना हजारोंच्या उपस्थितीत गौरविले. कोल्हापूरने मोठ्या जनसंख्येने दोन हृद्य सोहाळे अनुभवले. एक ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतरचा शाहू कुस्ती मैदानातील विक्रमी उपस्थितीचा गौरव सोहळा... त्याला सारे महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ उपस्थित होतं आणि शेवटची निरोप यात्रा... महानिर्वाण... त्यालाही हजारो लोक उपस्थित होते... शासकीय इतमामाने, नागरी सन्मानाने त्यांनी घेतलेला निरोप... त्यांना कोल्हापूरने दिलेला निरोप कोल्हापूरच्या सांस्कृतिक जीवनातील मैलाचा दगड ठरावा असा...

वि. स. खांडेकर चरित्र/१०७