पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/107

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 वि. स. खांडेकरांनी कोल्हापुरात राहून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीस गती दिली. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर जन्मशताब्दी, कवी भा. रा. तांबे गौरव समिती, इत्यादी माध्यमांतून खांडेकरांनी मौलिक ग्रंथसंपादने, हस्तलिखित इत्यादी संकलनाद्वारे मराठी साहित्य समृद्ध करण्यात मोलाचे योगदान दिले.
 स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीचं नेतृत्व वि. स. खांडेकरांकडे होतं. तेव्हा भारताचे बौद्धिक आणि कूट धुरीणपद आचार्य विनोबा भावे करीत होते. भारताने जी स्वप्ने घेऊन स्वातंत्र्य प्राप्त केलं होतं ती स्वप्ने स्वराज्यकाळात एकामागोमाग एक धुळीला मिळत जात होती. वि. स. खांडेकरांसारखा संवेदनशील लेखक या स्थितीत अस्वस्थ आणि व्यथित होता. सन १९५८ ची गोष्ट असेल. भूमिहीन शेतकऱ्यांंना जमीनदारांनी आपल्याकडील अतिरिक्त, अनावश्यक जमीन दान करावी म्हणून आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली होती. त्यासाठी त्यांनी भारतभर पदयात्रा काढली होती. मे, १९५८ मध्ये विनोबांचा कोल्हापूर दौरा होता. वि. स. खांडेकरांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील साहित्यिकांनी भेट घेऊन मार्गदर्शन मागितले होते. आचार्य विनोबांना एक प्रश्नावली अगोदरच पाठविण्यात आली होती. ती आजही आपणास शिवाजी विद्यापीठातील वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालयात वाचावयास मिळते. या भेटीप्रसंगी महाराष्ट्रातून नामवंत साहित्यिक दुर्गा भागवत, विंदा करंदीकर, दि. के. बेडेकर, विश्राम बेडेकर, ज्ञानेश्वर नाडकर्णी, प्रभृती साहित्यिक उपस्थित होते. भेट जयसिंगपूरला झाली. विनोबा दीड तास साहित्यिकांच्या प्रश्नांना उत्तरे देत होते. प्रश्न वि. स. खांडेकरांनी तयार केले होते. गंभीर गोष्ट अशी की, विनोबांच्या उत्तरांकडे आपण पाठ फिरविली आहे. आजच्या भारताच्या स्थितीचं रहस्य या उत्तरांत आहे.

 वि. स. खांडेकरांच्या नेतृत्वाखाली किती तरी सार्वजनिक, सांस्कृतिक सोहळे कोल्हापूरने अनुभवले. गानकोकिळा लता मंगेशकर असा जो उल्लेख आज सर्रास आपण करतो, त्याची सुरुवात कोल्हापूरातून झाली. लता मंगेशकर यांचे चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले ते वि. स. खांडेकरांच्या ‘माझं बाळ'पासून व तेही कोल्हापुरातच. लता मंगेशकरांनी चित्रपटाला पहिला आवाज दिला, तो कोल्हापुरातच. त्यांचा सन १९६८ साली कोल्हापूर नगरपालिकेतर्फे मानपत्र देऊन खासबाग मैदानात भव्य नागरी सत्कार करण्यात आला होता. नगराध्यक्ष एम. के. जाधव होते.

वि. स. खांडेकर चरित्र/१०६