पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/105

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 कोल्हापुरात पटकथा लेखनाबरोबर त्यांची साहित्यसाधनाही सुरूच होती. इथे त्यांचा परिचय स्कूल अँड कॉलेज बुक स्टॉलच्या दा. ना. मोघेशी झाला. ते पुस्तके प्रकाशित करीत. 'देवता' चित्रपटाच्या पटकथेवर आधारित ‘रिकामा देव्हारा' ही कादंबरी दा. ना. मोघंनी प्रकाशित केली. त्या वेळी ही कादंबरी चित्रपटगृहातही सिनेमाच्या तिकिटाबरोबर लोक विकत घेत. त्या काळी लोकांना चित्रपटाची पटकथा पुस्तिका, गाण्यांची पुस्तिका प्रचार, प्रसार, जाहिरात म्हणून दिली जायची. पुढे तर ‘सुखाचा शोध' चित्रपटावर आधारित कादंबरी चित्रपटातील छायाचित्रांसह प्रकाशित झाली व मराठी चित्रपटाच्या निर्मितीशी साहित्य जोडले गेले. यातून महाराष्ट्रात साहित्य आणि चित्रपट हातात हात घालून चालू लागले. या सांस्कृतिक अध्यायाचे जनक वि. स. खांडेकर ठरले.
 कोल्हापूरच्या शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक कार्याची शिलेदारी वि. स. खांडेकरांकडे चालून आली. त्या काळात खांडेकर शाळा, महाविद्यालयांतून वाङ्मय मंडळ उद्घाटन, साहित्यिक चर्चाना उपस्थित राहत. करवीर नगर वाचन मंदिर, राजाराम कॉलेज, करवीर साहित्य सभा ही सांस्कृतिक केंद्रे म्हणून सक्रिय होती. कोल्हापुरात ना. सी. फडके, कवी माधव ज्यूलियन, डॉ. व्ही. के. गोकाक यांच्यासारखी मंडळी होती. करवीर नगर वाचन मंदिरात साहित्यिक कार्यक्रम होत. राजाराम कॉलेजमध्येही व्याख्यानांचे सत्र चालायचे. करवीर साहित्य सभा नवोदितांचे साहित्य प्रकाशित करीत असे. या काळात 'करवीरच्या कळ्या' हा कथासंग्रह प्रकाशित झाला होता. या सा-यांत वि. स. खांडेकरांचे मार्गदर्शन, प्रोत्साहन, मदत होत राहायची.
 वि. स. खांडेकरांमुळे अनेक साहित्यिक कोल्हापुरी येत राहिले. ग. त्र्यं. माडखोलकर, के. नारायण काळे, आचार्य शं. द जावडेकर, आचार्य स. ज. भागवत, प्रा. वा. म. जोशी ही अशी काही नावे सांगता येतील. नंतरच्या काळात शंकरराव किर्लोस्कर, ना. धों. ताम्हनकर, बा. भ. बोरकर, मामा वरेरकर, वि. द. घाटे, चि. त्र्यं. खानोलकर, प्रभृती साहित्यकार नित्य कोल्हापुरात येत राहिले ते खांडेकरांमुळेच. वि. स. खांडेकर यांच्या प्रोत्साहन, प्रेरणेने रणजीत देसाई, विजया राजाध्यक्ष, सुमती क्षेत्रमाडे, कवी सूर्यकांत खांडेकर, रा. वा. शेवडे गुरुजी, इत्यादी सारस्वत उदयाला आले आणि घडले.

 ‘भारत छोडो' आंदोलनामुळे कोल्हापुरात समाजवादी युवक सभा, राष्ट्रसेवा दल, स्टुडंट युनियनसारख्या संघटनांची स्थापना होऊन राष्ट्रीय चळवळ जोर धरू लागली.

वि. स. खांडेकर चरित्र/१०४