पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/104

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रकरण पाचवे
वि. स. खांडेकर : संक्षिप्त समग्र मूल्यांकन

(अ) वि. स. खांडेकर :
कोल्हापूरच्या सांस्कृतिक घडणीचे शिल्पकार

 वि. स. खांडेकरांचा आणि कोल्हापूरच्या सांस्कृतिक जगताचा संबंध सन १९३० नंतर निर्माण झाला. सन १९३३ च्या प्रारंभी वि. स. खांडेकरांचे एक व्याख्यान राजाराम कॉलेजमध्ये झाले. ते खांडेकरांचे कोल्हापूरातले बहुधा पहिले व्याख्यान असावे. नंतर त्यांचे कोल्हापुरला येणे-जाणे सुरू झाले. ते चित्रपटांसाठी पटकथा लिहू लागले. त्यानंतरचे खांडेकरांचे मराठी चित्रपटसृष्टीतलं आगमन अनपेक्षितच म्हणावे लागेल. चित्रपट दिग्दर्शक मास्टर विनायक, अभिनेते बाबूराव पेंढारकर आणि कॅमेरामन पांडुरंग नाईक यांनी ‘कोल्हापूर सिनेटोन'पासून फारकत घेऊन ‘हंस पिक्चर्स'ची स्थापना केली होती. ही घटना सन १९३६ ची. नवशिक्षित प्रेक्षकांसाठी ध्येयधुंद सिनेमा काढून पदार्पणातच नावलौकिक कमावण्याचा त्यांचा मनसुबा होता. त्यांच्यापुढे आचार्य अत्रे आणि वि. स. खांडेकरांचे नाव होते. अत्रे त्या वेळी ‘उद्याचा संसार' नाटकात मग्न होते. म्हणून त्यांनी खांडेकरांना गळ घातली. त्यांनी 'छाया' ही आदर्शवादी कथा लिहून दिली. तो चित्रपट गाजला. त्याला चित्रपटसृष्टीचे पहिले ‘गोहर' सुवर्णपदक मिळाले. मग त्यांनी खांडेकरांकडे आणखी कथेची मागणी केली. पटकथा लिहायची म्हणजे निर्मितीपर्यंत अनेकदा चर्चा करावी लागते. खांडेकरांना प्रत्येक वेळी शिरोड्याहून येणे प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्रासाचं होऊ लागले म्हणून हंस कंपनीने त्यांना कोल्हापुरात स्थायिक व्हायचं निमंत्रण दिले. त्यानुसार खांडेकर सन १९३८ ला कोल्हापूरला आले आणि मग कोल्हापूरच त्यांची कर्मभूमी बनली.

वि. स. खांडेकर चरित्र/१०३