पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/102

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 नव्या-जुन्या स्त्रीतील फरक स्पष्ट करत ते म्हणतात, “जुन्या, अशिक्षित बायकांपेक्षा नव्या सुशिक्षित स्त्रिया असंतुष्ट आहेत, असमाधानी आहेत. जुन्या बायकांचं सुख हे अज्ञानातलं होतं... ते थोडेफार खरंही आहे; पण नव्या, सुशिक्षित स्त्रियांची दुःखं मात्र ज्ञानातून उद्भवली आहेत, असं मला वाटत नाही. प्रौढ, शिकलेल्या मुली पूर्वीच्या बायकांप्रमाणे पतीशी किंवा संसाराशी समरस होऊ शकत नाहीत. त्यांचा अहंकार अधिक जागृत झालेला असतो. आपल्या मतांचा आणि व्यक्तिमत्त्वाचा त्यांना स्थानी-अस्थानी अभिमान वाटतो; पण त्या एक गोष्ट विसरतात - अहंकार हा प्रीतीचा सर्वांत मोठा शत्रू आहे." खांडेकरांच्या या विचारांशी सर्वच सहमत होतील, अशातील भाग जरी असला तरी त्यामागची व्यापक समाजहित भावना कोणीही निर्विवाद मान्य करील.

 वि. स. खांडेकरांच्या सर्व साहित्यप्रकारातील लिखाणात अशा प्रकारचे समाजचिंतन आढळतं. खांडेकरांनी आपल्या साहित्याला रंजनाबरोबर उद्बोधनाचे साधन म्हणून वापरलं. त्यांच्या साहित्यात कलात्मक सौंदर्य जितकं उच्चकोटीचं तितकंच समाजभानही. त्यांचा मूळ पिंड हा तत्त्वचिंतकाचा. मानवी कल्याणाचा ध्यास लागलेले खांडेकर वाचीत असताना असं कधीकधी वाटू लागतं की, हा माणूस घेऊन येणारी कथानकं, पात्र केवळ निमित्त आहेत. ती त्यानं द्रष्टेपणानं उभारलेली अपरासृष्टी आहे. त्यातील पात्र कथाकारांच्या कळसूत्री बाहुल्या आहेत. त्या बाहुल्या तो आपल्या बोटांवर लीलया नाचवतो. त्याची पात्रे जी पोपटपंची करतात, त्यामागे बोलविता धनी कोणी दुसरा आहे... तो आपले विचार, भूमिका, अधिष्ठान सोडायला तयार नाही... त्यानं समाजप्रबोधनाचं स्वीकारलेलं बिरूद तो टाकायला तयार नाही... तो दृढसंकल्प आहे... भीष्मप्रतिज्ञा आहे. समाजचिंतकाचं ध्रुवपद हेच त्याचे अढळ असं बलस्थान आहे. आजवर वि. स. खांडेकरांच्या अभ्यासक, समीक्षक, संशोधकांनी त्यांच्या साहित्यिक सौंदर्यावरच भर दिला व प्रसंगी त्यांच्या सौंदर्य अतिरेकाबद्दल (आलंकारिक भाषा इत्यादी) दुषणेच दिली. त्यांनी कधी त्यांच्या समाजचिंतक भूमिकेचा, योगदानाचा गंभीरपणे विचार केला, असे दिसत नाही. त्यामुळे या चरित्र ग्रंथाचे शीर्षकच मुळी ‘समाजशील साहित्यिक' अशा विशेषणरूपाने येतं, त्यामागे या पक्षाकडे लक्ष केंद्रित करण्याचा उद्देश आहे. शिवाय ही चरित्रमाला आम्ही 'शिळोप्याचा उद्योग' वा 'मिळकतीचा उपक्रम' म्हणून हाती घेतलेला नाही. या चरित्रलेखन प्रकाशनाचे भान खांडेकरांच्या साहित्यभान व भूमिकेशी सुसंगत आहे. म्हणून वि. स. खांडेकरांचं समग्र साहित्य एक व्यवच्छेदक लक्षण घेऊन येतं, असं मला कायम वाटत आलं आहे.

वि. स. खांडेकर चरित्र/१०१