पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/100

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तो हव्यासच त्याला हिंस्त्र बनवितो हे त्रिकालाबाधित सत्य होय. 'जगातले मुत्सद्दी मानवतेला सुखी करण्याकरिता युद्धाच्या खाईत केव्हा लोटतील याचा नेम नाही. जगात व्यापारी मनुष्याच्या सुखसोई वाढविण्याचे सोंग करून मायेचा बाजार कसा मांडतील आणि किती लुबाडतील याला मर्यादा नाही. जगातला दंभ सामान्य मनुष्याला गोड गोड अशी वचने देऊन त्याच जिवावर प्रत्येक क्षेत्रात किती काळ चरत राहील, हे सांगणे कठीण आहे. अशा स्थितीत माणुसकीचा आधार एकच आहे - तो म्हणजे संस्कृतीची सारी मूल्ये सांभाळण्याकरिता धडपडणारा, तडफडणारा सामान्य माणूस'.
करुणा

 ‘बुद्ध, ख्रिस्त आणि गांधी' नावाची वि. स. खांडेकरांची एक सुंदर रूपककथा आहे. त्या कथेत हे महात्मे परत पृथ्वीतलावर अवतरले तर त्यांना ‘हेचि फळ काय मम तपाला' असा पश्चात्ताप झाल्याशिवाय कसा राहणार नाही, याचे खोचक नि मार्मिक वर्णन आहे. खांडेकर एक कादंबरीही लिहिणार होते - ‘बुद्ध आणि हिटलर' तिचं शीर्षक होतं. त्याचा कच्चा खर्डाही तयार होता. दीनानाथ दलाल खांडेकरांच्या कादंबऱ्यांची मुखपृष्ठे तयार करीत. या संकल्पित कादंबरीचं मुखपृष्ठही तयार झालं होतं. शिवाजी विद्यापीठाच्या वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालयात ते दिमाखात प्रदर्शित करण्यात आलं आहे. खांडेकरांचं समग्र सामाजिक चिंतन म्हणजे करुणेविरुद्ध असलेल्या क्रौर्याच्या निर्दालनाची शिकस्त! कामभावना माणसास हिंस्त्र पशू बनवते तसे क्रौर्यही! क्रौर्य संपायचं तर करुणेचं साम्राज्य सर्वत्र नांदायला हवं. जिथे करुणेची पावले उमटतात त्याच अंगणात सात्त्विकता नि संस्कृती वास्तव्य करते. जीवनाची ‘अमृतवेल' बहरायची तर करुणेस पर्याय नाही. हे विशद करताना खांडेकर म्हणतात, 'मनुष्य स्वभावतः क्षुद्र आहे, स्वार्थी आहे, अहंकारी आहे; सुखलोलुप आहे; नाना प्रकारच्या वासनांत बरबटलेला आहे. संस्कृतीने बहाल केलेले सात्त्विक मुखवटे चढवून आजकाल तो जगात वावरत आहे! पण मुखवट्यांनी काही मन बदलत नाही! माणसाच्या उद्दाम मनोविकारांना उत्कट करुणेची जोड मिळायला हवी! ‘तत! त्वमसि!' असं वाटायला लावणारी करुणा! ही करुणा नसेल, तर मनुष्य पशू होईल! Passion and Compassion must go hand in hand. माणसाचं मन बदललं तरच जग बदलेल! त्यातलं दुःख कमी होईल. जग करुणेने, सत्शीलतेनी बदलण्याची धडपड हा खांडेकरांच्या समाजचिंतनाचा पायाच होता.

वि. स. खांडेकर चरित्र/९९