पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/10

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आपल्या काकांना, सखाराम खांडेकर यांना, दत्तक गेल्याने विष्णू सखाराम खांडेकर झाला. तो दत्तक मुलगा म्हणजेच मराठीतील सुविख्यात साहित्यिक वि. स. खांडेकर होत.
जन्म व बालपण
 वि. स. खांडेकरांचा जन्म ११ जानेवारी, १८९८ रोजी सांगली येथे त्यांच्या आजोळी झाला. गणपतीच्या देवळातच त्यांचे घर होते. तिथे जन्म झाला म्हणून त्यांचे नाव गणेश ठेवले गेले. ते आपल्या वडिलांना दादा म्हणत. वडील मुन्सफ होते. नोकरीत फिरती असायची. त्या वेळी सांगलीत आलेल्या एका अॅडमिनिस्ट्रेटरशी त्यांचं बिनसले. मुन्सफाची नोकरी सोडून ते सबरजिस्ट्रार झाले. त्यांचे घर सुखवस्तू होते. कपडा-लत्ता, खेळणी, खाऊ मिळाला नाही, असे कधी झाले नाही. घरी मोलकरीण, स्वयंपाकीण होती. वडिलांची थोरा-मोठ्यांत ऊठबस होती. त्यांची मुलांवर माया होती.गणेश शेजारच्याच मंडईमागील शाळेत जाऊ लागला. तिसरीत गेला आणि त्याचा खोडकरपणा कमी झाला. तो अभ्यास करू लागला. चौथीत दुसऱ्या क्रमांकाची तीन रुपयांची शिष्यवृत्ती पटकावून त्याने आपल्या बुद्धीची चुणूक दाखविली. त्याला कीर्तन-पुराणांचा नाद होता. हा देवळात घर असल्याचा परिणाम. तो बारा-तेरा वर्षांचा झाला असेल (सन १९११) तोच त्याला वाचन व क्रिकेटचा छंद जडला. घरी वडील आजारी असत. त्यांची शुश्रूषा तो मनापासून करायचा. त्या आजारातच वडिलांचे निधन ११ ऑक्टोबर, १९११ रोजी झाले. पोरकेपणातून त्याला नाटकाचे वेड लागले. त्या काळी सांगली संस्थानात नाटकाचे मोठे वेड होते. विष्णुदास भावे, गोविंद बल्लाळ देवल, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकरांसारख्या नाटककारांची ही नगरी, महाराष्ट्राची नाट्यपंढरीच मानली जायची. 'शारदा', ‘भाऊबंदकी', 'सवाई माधवरावांचा मृत्यूसारखी नाटके गणेशनी बालपणीच पाहिली.‘शापसंभ्रम', 'शारदा'मधील पदे त्याला तोंडपाठ होती. एकदा ती देवलांना म्हणून दाखवून त्याने त्यांची शाबासकीही मिळविली होती.

 गणेश पंधरा वर्षांचा असेल. अभ्यासात हुशार तर होताच; पण अभ्यासापेक्षा वाचनाचे वेड मोठे. अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी', दाभोळकर ग्रंथमालेतील स्पेन्सर, मिल इत्यादी, हरिभाऊ आपटे यांच्या कादंबऱ्या, शनिमहात्म्य, नवनीत, वामन पंडित, मोरोपंत यांचे काव्य, केशवसुतांची कविता, त्याने अल्पवयातच वाचल्या. वाचनाची त्याची भूक बकासुरासारखी होती. त्याचे वाचन वावटळीसारखे होते.

वि. स. खांडेकर चरित्र/९