पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत

उमलतीचे रंग, गंध



 गाभुळलेली.. गदरलेली चिंच . आकडा कसा भल्यापुऱ्या दिवसांचा . वरची टणक साल गरापासून सुटत सुटत आलेली आणि गच्च भरलेल्या आंबट गराचा थर आता गोडुला व्हायला लागलेली. हिरवट रंगावरची गुळचट गुलाबी सायीची चव ज्यांनी चाखलीय त्यांनाच गाभुळ्या चिंचेचे वेडे कवतिक समजून घेता येते . ही अशी चिंच पुण्याच्या बाजारातदेखील मिळत नाही. येता जाता चिंचेची झाडं हेरावी लागतात नि नेम धरून दगडही मारावे लागतात . अशी चिंच एकदा चाखलीत ना, तरी आयुष्यभर ती जिभेवर चांदणी गोंदवून जाते.
 या गाभुळ्या चिंचेची चव नि आपलं बालपण ! जणू काही देठाच्या जोडकैऱ्या. बालपण हे नेहमी आठवत बसावे असे . या वालपणाची गोडी भल्याभल्यांनी गायली आहे . कविराज भवभूतीसारखा कवी तर 'तेहि नो दिवसो गतः' अशी हळहळ व्यक्त करतो. तर आधुनिक कविश्रेष्ठ केशवसुतांना बालपणीचे सुख हरपल्या श्रेयासारखे वाटते.
 पण हे सतत झेलत रहावे वाटणारे बालपण किती जणांच्या आणि किती जणींच्या वाट्याला येते? कळायला लागतं तेव्हापासून शेणाच्या मागे टोपली घेऊन हिंडताना, भर उन्हात शेरडं चारताना , हात दुखेस्तो गोवऱ्या नि भाकरी थापताना, अंगणातल्या बाभळीवर हिरवे पोपट आणि गाणाऱ्या साळुऺक्या कधी येऊन जातात तेही कळत नाही! मग त्यांनी घातलेली साद कानावर कशी पडणार?
 बालिकावर्षाच्या निमित्ताने या पोरीसोरींशी गप्पा मारताना, त्यांच्यासोबत हिंडताना, आलेले अनुभव नि काही धागे माझ्या लहानपणीच्या अनुभवाचे. या अनुभवांच्या ठिपक्यातून एखादं अंधुक चित्र आकार घेईल कदाचित.

܀ ܀ ܀
एक

 जानेवारीतली सकाळ . जीपमध्ये पाचगावच्या नऊजणी , मी नि सुनीता. शाळा अर्ध्यातून सोडणाऱ्या बालिकांचे दोन दिवसांचे शिबिर आहे . त्यासाठी 'मानवलोक 'च्या वतीने काही मुलींना घेऊन आम्ही निघालो आहोत . जीप उदगीरच्या दिशेने धावतेय .

उमलतीचे रंग, गंध ॥१९॥