पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत

शकत नाही . सामूहिक वहिष्काराची वा मारहाणाची प्रकरणे सर्वत्र होत असतात . हुंड्यापायी हजारो कोवळ्या पोरींची लग्ने विजोड वरांशी लावली जातात , शेकडो मुली जाळल्या जातात . धर्माच्या नावानं तरुण पोरींची लग्ने देवाशी लावून त्यांना बाजारात वसवले जाते तर ,आणखी दोनशे पाचशे वर्षानंतर आपल्या भावी पिढ्यांनी कोणता सांस्कृतिक वारसा मिरवावचा? सांस्कृतिक वारसा मिरवताना आपण पुढच्या पिढ्यांना काय देणार आहोत; त्यांचा विचार अधिक महत्त्वाचा!
 गतकाळातल्या मोडक्या गढ्या इलेक्ट्रॉनिक झगमगाटाने नटवून त्यांचे सांस्कृतिक गोडवे गाणांची आज चलती आहे. सामाजिक जखमांच्या मूळ कारणांपर्यंत पोचवणारी क्ष-किरणांकित नजर तरुणांना प्रदान करणारी सांस्कृतिक पोटे मोडकळीला आली आहेत. अशा वेळी सेवादलाच्या पन्नास वर्षांच्या वाटचालीचा , पडझडीचा , धडपडीचा , चिकित्सक आढावा घ्यायला हवा.
 सेवादल ही शेवटच्या माणसाला कवेत घेणारी सांस्कृतिक चळवळ आहे. तिचा राजकारणाशी जरूर संबंध आहे. मात्र तो पक्षीय राजकारणाशी नाही . सामाजिक न्याय , समान संधी, विज्ञाननिष्ठा , सर्वधर्मसमभाव , स्त्रीपुरुष समानता , लोकशाही समाजवाद , राष्ट्राभिमान या मूल्यांशी मात्र निश्चितच आहे.
 'मानवलोक ' ने सेवादलाच्या शाखा खेड्यांतून सुरू केल्या. आज २५ खेड्यात शाखा आहेत . हजारो मुले सायंकाळी मैदानावर जमतात . या शाखा उद्या आणखीन वाढवण्याची जिद्द आम्ही धरली आहे. या शाखांना जोडून आम्ही संस्थेच्या वतीने रात्रीच्या अभ्यासिका सुरू केल्या आहेत . दिवावत्ती, जागा आणि पुस्तके या सोयी असलेल्या अभ्यासिकांमुळे मुलांचा शैक्षणिक दर्जा तर उंचावलाच , परंतु अर्ध्यातून शाळा सोडलेली मुले तेथे नियमित येऊ लागली . शाळेत जाणाऱ्यांचे प्रमाणही वाढले. राष्ट्रसेवादल खेड्यांतून आणि झोपडपट्ट्यातून अशा अभ्यासिकाही चालवू शकेल .
 आज समाजातला सार्वजनिक विवेक संपलाय. क्षुल्लक कारणांवरून रक्तपात घडताहेत . जात, धर्म यांच्या मागील अंधश्रद्धा आणि रुढीप्रियता कमी झाली असली तरी या दोन गोष्टींचा वापर करून राजकारणाचे डाव मांडता येतात , हे पुढाऱ्यांच्या लक्षात आल्याने विकृत , गुंतागुंतीची जातीयता आणि धर्मवेडेपणा यांची वाढ होतेय .
 आणि म्हणूनच राष्ट्रसेवादलाच्या शाखा , सेवापथके , वौद्धिकवर्ग , कलापथके यांची गरज नव्याने निर्माण झाली आहे .

कश्मिर हो या कन्याकुमारी
भारतमा एक हमारी
गर्वसे कहो हम भारतीय है
प्यारसे कहो हम इन्सान है ...

 या सारख्या घोषणांनी गाव दुमदुमून जाते.

संस्कार सेवादलाचा ॥ १७ ॥