पान:वाटचाल (Vatchal).pdf/9

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

माझी आई : ९

आमच्याकडच्या मानाने आई गोरीच म्हणायला पाहिजे. तशी रंग-रूपाने ती बऱ्यापैकी. अगदी हजारजणींत देखणी नसली तरी दहाजणींत उठून दिसणारी. पण आपण रूपाने सुंदर आहो, बरे आहो, सामान्य आहो, असा स्वतःच्या रूपाविषयी तिने कधीही कोणता उल्लेख केलेला मला आठवत नाही. आपल्या रूपाचा अभिमानही तिच्यात मला दिसला नाही. अगर आपण फारशा रूपवान नाही, ही खंतही तिला वाटली नाही.
 आई ही नेहमी कामाची म्हणून प्रसिद्ध असे. अतिशय कामसू म्हणून सर्वजण तिला वाखाणीत. या कामसूपणाबरोबर असणारा तिचा न संपणारा उत्साह आणि उल्हास मात्र कुणाच्या ध्यानी येत नसे. खूप मोठा होईतो माझ्याही कधी ध्यानी आला नाही. माझ्या लहानपणापासून भांडी घासणे व घर सारवणे यासाठी घरी मजुरीण असे. पण आंगण, ओसरी झाडणे, सडा टाकणे, ही कामे तीच करी. दोन्ही वेळचा स्वयंपाक असेच. त्या काळी नळ नव्हते, त्यामुळे २५-३० घागरी पाणी शेंदणे असेच. नेहमी लहान मूल असेच. त्याचेही सगळे तीच करी. रात्री अंथरुणे टाकणे तीच करी. सकाळी पाचपासून रात्री दहापर्यंत हे काम सतत चालू. आणि शिवाय देवपूजेची भांडी, पिण्याच्या पाण्याचा वंब, घागर तीच घासत असे. सणावारी सोवळ्याचा स्वयंपाक असे. विटाळशीपणी ज्वारी निवडणे, डाळी सडणे, तांदूळ सडणे, हे उद्योग असायचे. धुणे तीच धूत असे. बाळंतपणीसुद्धा स्वेटर विणणे, पडदे विणणे असे विणकाम, भरतकाम चालायचे. खरे म्हणजे, इतके शरीरकष्टाचे तिला कारण नसे. घरी शिकण्यासाठी मुले असत. त्यांनी मुले सांभाळली असती, पाणी भरले असते, अंथरुणे टाकली असती. भांडयासह धुणे मजुरणीकडे देता आले असते. पण तिला कामाचा उरकही खूप, हौसही खूप. इतके काम केल्यानंतर सुद्धा अनेक लोणची, चटण्या यांना वेळ असे. शेजारच्या बायकांकडे गप्पा मारण्यास वेळ असे. कामामुळे ती वैतागली आहे असे कधी घडायचे नाही. आणि मूल दुसऱ्याच्या अंगावरचे होणे तिला पटायचे नाही. दिवाळीत तर आम्हांला तेल लावून स्नान घालणे व मध्येच फटाके उडविणे असे दुहेरी काम तिचे चाले. श्रम करण्याची तिची अफाट शक्ती व हौस याचे नेहमीच मला आश्चर्य वाटत आले आहे. अलीकडे नवरा मूल सांभाळतो व पत्नी स्वयंपाक करते हे जेव्हा मी पाहतो, तेव्हा मला गंमत वाटते. नवऱ्याने घरकाम करावे याला माझी हरकत नाही. उलट पत्नीला मदत केलीच पाहिजे, असे मला वाटते. पूर्वीही सगळ्याच स्त्रिया माझ्या आई इतक्या कामाच्या व हौशी नसणार. आमच्याकडेही पुरुषमाणसे काम करीत. कामाची लाज त्या काळच्या मध्यमवर्गात नसे. पण मूल लहान आहे म्हणून कुणीतरी ते सांभाळल्याशिवाय कसा स्वयंपाक करणार ? हा रडकेपणा आमच्या घरी आईच्या वेळीही नव्हता. माझ्या पिढीतही नव्हता.