पान:वाटचाल (Vatchal).pdf/40

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

४० : वाटचाल

आधारावर परोपजीवी म्हणून कुठवर राहणार ? वडील बोलले काहीच नाहीत. पण घरचे पैसे खर्च करून लग्न करायचे व पुन्हा मुलगा व सून यांचा चरितार्थ चालवावयाचा हे त्यांनी काय म्हणून करावे ? हे सारे प्रश्न माझ्यासमोर होते.
 मनाला पटलेली मुलगी मिळाली. काव्यमय भाषेत सांगायचे तर प्रेम सफल झाले. त्यामुळे अतिशय गोंधळून व बावरून गेलो होतो. लग्नानंतर शक्यतो लवकर नोकरीस लागणे भाग आहे हे मला जाणवू लागले. एक पुढची योजना म्हणून मी भावी पत्नीसमोर कल्पना अशी मांडली की, आपण दोघेही नोकरी करू. माझ्या पत्नीने प्रथम सांगितले, " आपण ह्याचा विचार लग्नानंतर करू." आणि मनमोकळं बोलताना तिने तिचा मुद्दा समजावून सांगितला. थोडक्यात तिच्या बोलण्याचा आशय असा की तिला नोकरी लागली म्हणजे संसार सांभाळण्याची जबाबदारी तिच्यावर पडेल व मग समाजसेवा करण्यासाठी मी मोकळा राहीन हे तिला मान्य नाही. संसार नीट चालायचा असेल तर दारिद्रयाला काहीच हरकत नाही, गरिबीची तिला सवय आहे आणि गरिबीतच जन्म काढायची तिची तयारी आहे. पण नवरा घराला घट्ट बांधला पाहिजे यामुळे ती नोकरी कधीच करणार नाही. विवाहानंतर माझ्या आईवडिलांनी म्हणजे तिच्या सासूसासऱ्यांनी सुनेच्या म्हणण्याला भक्कम पाठिंबा तर दिलाच पण सूनबाई अतिशय हुशार व कर्तबगार म्हणून तिचे कौतुकही केले. आपण व आपणच नोकरी केली पाहिजे, एकजण कमावता व तोही मट्रिक, म्हणजे गरिबीत जन्म काढला पाहिजे यालाही मी मनाने तयार झालो. पण नोकरी मिळण्यास तयार नव्हती. खरे म्हणजे मला नोकरी मिळण्यास अडचण पडू नये. हैद्राबादेतील फार मोठमोठ्या माणसांचे माझ्यावर प्रेम होते. कै. स्वामी रामानंद तीर्थांचे तर विशेष वात्सल्य होते. पण 'मला नोकरी द्या,' म्हणून या थोरांच्यापैकी कुणाकडे जाण्याची माझी तयारी नव्हती. दीड वर्ष नोकरीसाठी मी भटकत होतो आणि ती मला लागत नव्हती. पण मी कोणाच्या शिफारशीसाठी प्रयत्न केला नाही. दीड वर्षाच्या वाट पाहण्यानंतर एकदा देव प्रसन्न झाले आणि एकदम दोन नोकऱ्या लागल्या. त्यांतील अधिक पगाराची नोकरी नांदेडची म्हणजे दरमहा ५६ रु. ७ आणे एकूण पगाराची होती.
 नोकरीसाठी नांदेडला मी निघालो तेव्हा वडील म्हणाले, "हे बघ, पगार कमी आहे याची चिंता करू नकोस. लागतील तसे पैसे मला माग, मी पाठवीन आणि नोकरी आवडली नाही तर सरळ सोडून दे व परत ये." पत्नीने सांगितले, "हे पहा, पगार कमी याची चिंता करू नका. उगीच जास्त पैसे मिळवण्याच्या नादी लाग नका. फक्त नोकरी टिकवा. मी तितक्याच पैशात नीट संसार मांडीन। दोघांचेही उपदेश ऐकून मी नोकरीवर रुजू झालो. जुलै १९५५ च्या शेवटी सेवेला आरंभ झाला. ऑगस्टमध्ये मुख्याध्यापकांनी मला सांगितले, " तांत्रिक बाबी विसरा.