पान:वाटचाल (Vatchal).pdf/39

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असेही दिवस- : ३९

पाहत होती. ती थोडीशी थांबली. मी म्हटले, " मी हैद्राबादचा कायमचा निरोप घेतो आहे. यापुढे मी हैद्राबादला येणार नाही. हैद्राबाद सोडण्यापूर्वी एक कर्तव्य पार पाडणे भाग आहे ते म्हणजे तुला विचारण्याचे. तू माझ्याशी लग्न करणार काय ? तू एकदा स्पष्टपणे नकार दिला, म्हणजे हे गाव सोडण्यास मी मोकळा होईन." माझी अशी अपेक्षा होती की " मला असला फाजिलपणा मान्य नाही," असे म्हणून ती झटक्यात घरी जाईल. तिचे भाऊ माझा शोध घेण्यास येईपावेतो मी हैद्राबाद सोडले असते. एक धोका होता. तिथे सडकेवरच तिने काही आरडाओरडा केला असता तर सडकेवर मार खाण्याचा धोका होता. तो मी पत्करलेला होता. प्रभावती दुसंगे क्षणभर गोंधळली, कावरीबावरी झाली आणि मग शांतपणे म्हणाली, "मला थोडा अवधी द्या. मी येत्या शुक्रवारी या प्रश्नाचे नक्की उत्तर देईन." गेली २५-२६ वर्षे सर्व अनपेक्षित संकटांत तितकेच धीमेपणाने ती तोंड देत आली आहे. अत्यंत शांत व थंड पण नि:संदिग्ध वागण्याची जी तिची शक्ती आहे तिला मी अजनही वचकून असतो.
 हट छट करीत झुरळ झटकल्याप्रमाणे मला झटकून जर ही मुलगी पुढे गेली असती तर काय झाले असते ? मी हैद्राबाद सोडून बाहेर पडलो असतो. त्या काळी फक्त हाफ पँट व शर्ट हे दोनच कपडे मी वापरी. डोक्यावर लांब शेंडी असे. केस नसतच. आईवडिलांना वाटे, पोरगा हातातून चालला. आता हा शिकणारही नाही आणि लग्न करून संसारही करणार नाही. मी दीर्घकाळ लग्न केले नसते हे खरे. परीक्षा दिल्याच नसत्या म्हणून पुढे प्राध्यापक इत्यादीही झालो नसतो. व्याख्याने कदाचित दिली असती पण फारसे लिहिले नसते. अधिक मोकळा व कमी जबाबदार झालो असतो. काय झाले असते याचा विस्तार करण्यात अर्थ नाही. कारण ते झाले नाही. बरोबर शुक्रवारी प्रभावतीबाई अचूकपणे आल्या. ती त्या वेळी फक्त सतरा वर्षांची होती. पण वागणे आजच्यासारखेच आत्मविश्वासपूर्ण होते. तिने सांगितले, "मी विवाहाला माझ्या वडिलांची संमती मिळवलेली आहे. त्यांनी तुला भेटण्यास बोलाविलेले आहे." म्हणजे मधल्या तीन दिवसांत घरचा विरोध संपवून सारे ठरवनूच ती आली होती. मी भावी सासऱ्याकडे जाऊन होकार नक्की करून आलो.
 या क्षणापासून पुढची पावणेदोन वर्षे अतिशय चिंतेची अशी होती. तसा लग्नाला विरोध कुणाचा नव्हताच. एक तांत्रिक बाब म्हणून प्रत्येकाने कसाबसा एक दिवस विरोध दाखविला. खरे म्हणजे मी लग्नाला तयार झालो या आनंदात आई-वडील होते. माझ्या वडिलांनी तक्रार न करता हौसेने, मुलीचे लग्न करावे तसे मोठ्या थाटाने माझे लग्न लावून दिले. चिंतेत मी होतो. ज्या प्रश्नांचा आजवर कधी विचार केला नव्हता ते प्रश्न एकदम समोर उभे राहिले. मी मॅट्रिक-बेकार. मी लग्न ठरवतो आहे. पत्नीलाही नोकरी नाही. आम्ही जगणार कसे ? वडिलांच्या