पान:वाटचाल (Vatchal).pdf/38

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

३८ : वाटचाल

अभ्यासू तरुण आणि वक्ता म्हणून थोडीफार कीर्ती होती. शिकण्यावरील लक्षच उडाले होते. तेव्हा पदवी नाही ही खंत नव्हती. हैद्राबाद सोडायचे हे ठरले, पण पुढे काय याचा विचारच अजून केलेला नव्हता. हैद्राबादला मला बांधून ठेवणारा एक प्रबळ धागा होता. तेव्हा हा धागा तोडला म्हणजे मग मी मोकळा होणार होतो. या प्रबळ धाग्याचे नाव प्रभावती दुसंगे असे होते. स्वतःभोवती मित्रांचा फार मोठा परिवार सतत सांभाळणारा असा माझा स्वभाव आहे. त्यामुळे मित्र-मैत्रिणींचे फार मोठे कोंडाळे माझ्या भोवती नेहमीच असे. पण ज्या मुलीशी लग्न करावे असे मला आयुष्यात पहिल्यांदा वाटले ती ही मुलगी. मी तिच्या घरी जात-येत असे. त्या वेळी महिन्या दोन महिन्याला एखादे औपचारिक वाक्य बोलणे याहून त्या मुलीशी जास्त संभाषण नव्हते. तिचे मला पत्र नव्हते. माझे तिला पत्र नव्हते. कधी घराबाहेर गाठीभेटी नव्हत्या. दुरून जी नजरभेट होई तो मुख्य परिचय. अशी चार वर्षे आराधना चालू होती. हा धागा तोडल्याशिवाय हैद्राबाद सोडणे शक्य नव्हते. हा धागा तोडण्याचा जो प्रयत्न मी इ. स. १९५३ ऑक्टोबरमध्ये केला त्यामुळे सगळे जीवनच पालटून गेले.
 हैद्राबाद सोडायचेच होते. या मुलीला कधी भेटलेलो नव्हतो. कोणताही शब्द कधी दिला-घेतला नव्हता. म्हणून फसवणूक कोणाचीच नव्हती. शांतपणे हैद्राबाद ऑक्टोबर ५३ ला सोडले असते तर मग सगळे जीवनच बदलून गेले असते. आज जे दिसते त्यापैकी काहीच घडले नसते. मी नोकरीही केली नसती. पुढे परीक्षाही दिल्या नसत्या. कदाचित व्याख्याने दिली असती. एखादा लेखही लिहिला असता, पण तो कोणी वाचला नसता. पण हे घडायचे नव्हते. ज्या मुलीत आपले मन इतके गुंतलेले आहे तिचा स्पष्ट नकार घेतल्याशिवाय हैद्राबाद सोडण्याची कल्पनाच त्या वेळी मनाला पटेना. ज्या मुलीने प्रत्यक्ष अगर अप्रत्यक्ष, स्पष्ट अगर अस्पष्ट, असा कोणता होकारच दिलेला नाही, तिचा स्पष्ट नकार मिळवण्याचा आग्रह हा वेडगळपणाचा प्रकारच म्हटला पाहिजे. पण हा वेडगळपणा माझ्या स्वभावाचा न बदलणारा भाग आहे.
 पण मी ठरवले ते हे की आजवर या मुलीला आपण भेटलो नाही, आता भेटायचे, स्पष्टपणे तिचा नकार घ्यायचा आणि मग हैद्राबाद सोडायचे. आपल्यासारख्या भणंग माणसाचे मन चार वर्षे ज्या मुलीने काही न बोलता बांधून ठेवले तिचेही मन आपल्यात गुंतले असेलच, याचे भान काही त्या वेळी आले नाही.
 ऑक्टोबर १९५३ चा शेवटचा आठवडा चालू होता. मंगळवारचा दिवस होता. भर दुपारी दोन अडीचच्या सुमारास मी प्रभावती दुसंगे यांना सडकेवर एकटे गाठले. मी म्हटले, " थांब, मला तुझ्याशी काही बोलायचे आहे." ती जणू एक दिवस हा प्रसंग येणार हे गृहीत धरूनच होती. जणू या प्रसंगाची वाटच