पान:वाटचाल (Vatchal).pdf/37

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असेही दिवस-



ऑक्टोबर १९५३ ते ऑगस्ट १९५५ हा सुमारे पावणेदोन वर्षांचा काळ माझ्या जीवनात चिंतेचा, अस्वस्थपणाचा व अस्थिरतेचा असा काळ आहे. माझ्या पुढील जीवनाची दिशा ह्या काळातच ठरली. आज इतक्या वर्षांनंतर ह्या काळाकडे जेव्हा मी पाहतो त्या वेळी माझे मलाच समाधान वाटू लागते. माणूस ज्या वेळी अस्थिर होतो, अडचणीत येतो, त्याचे अस्तित्वच अस्थिर होते, त्याच वेळी तो मनातून कोसळण्याची व भलत्या तडजोडी करण्याची शक्यता असते. या कोंडीत सापडण्याच्या अवधीतच तो हताश झाला म्हणजे आतताई, अतिरेकी होतो. हे दोन्ही प्रकार माझ्या बाबतीत घडले नाहीत. आपण कोंडीत सापडलो आहोत आणि बाहेर पडण्यास मार्ग दिसत नाही,

हे चित्र समोर असतानासुद्धा माझ्या हातून गैर काही घडले नाही. फार तर अहंतेला उपकारक असा उद्धटपणा, खोडकरपणाच घडला, याचे मला समाधान आहे. तो काळ पुन्हा वाट्याला येणार नाही हे खरे. पण जर आलाच तर किरकोळ तपशील वगळता मी जसा वागलो तसाच पुन्हा वागेन, असे मला वाटते.
माझ्या अस्वस्थपणाचा आरंभ माझ्या एका निर्णयामुळे झाला. राजकारण संपलेले होते; राजकारणात भोवताली पूर्ण पराभव पसरलेला होता; शिक्षणावरून लक्ष उडालेले होते; मग उगीच हैद्राबादला राहायचे कशाला, असा विचार करून हैद्राबाद कायमचे सोडायचे असे मी ठरवले. पदवी नव्हती, पण

वा...३