पान:वाटचाल (Vatchal).pdf/33

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

माझे मामा : रामचंद्रराव नांदापूरकर : ३३

नसते. दातृत्वाचे प्रदर्शन करून इतरांचे दैन्य उघडे करणे, त्यांच्या स्वभावात नव्हते. खोन्यांनी पैसा मिळवावा आणि ओंजळी भरून तो पैसा उधळावा, तरीही काही कमी पडू नये, असे यश त्यांच्या हाताला होते. अतिशय चिडखोर आणि रागीट, खूपच हट्टी, पण अतिशय दिलदार, फार मोठा मित्रांचा मेळावा उभा करणारे, हजारोंना आधार वाटणारे असे दादा होते.
 दादांचे घर हा राजकारणाचा एक अड्डा असे. इ. स. १९३८, इ. स. १९४२ आणि इ. स. १९४७ असे तीनदा ते तुरुंगात होते. पहिल्या वेळी नऊ महिने, दुसऱ्या वेळी चौदा महिने, तिसऱ्या वेळी साडेपाच महिने ते तुरुंगात होते. उरलेल्या वेळी म्हणजे जवळजवळ साडेआठ महिने ते भूमिगत सशस्त्र आंदोलनाचे एक प्रमुख नेते होते. हैद्राबादच्या संस्थानी काँग्रेसमध्ये मार्क्सवादी विचाराचा जो जहाल समाजवादी गट असे त्यांचे दीर्घकाळ दादा एक प्रमुख नेते होते. हैद्राबाद संस्थानात हैद्राबाद शहरकाँग्रेसचे ते दीर्घकाळ उपाध्यक्ष होते. वकिलीची परीक्षा पास झाल्याच्या नंतर पहिली तुरुंगयात्रा करून येईपावेतो त्यांचा संसार असा नव्हताच. एकोणचाळीस सालापासून जे थोडेफार मांडले ते बेचाळीस साली विस्कटून गेले. जे चव्वेचाळीस सालापासून मांडले ते सत्तेचाळीसला विस्कटून गेले. त्यांच्या आयुष्याला स्थैर्य पोलिस ॲक्शन झाल्याच्या नंतरच आले. त्यात आरंभी ४९ ते ५६ ह्या काळात हैद्राबादला निष्णात वकील म्हणून ते गाजले. ५६ नंतर मुंबईत त्यांच्या मृत्यूपर्यंत यशस्वी वकील म्हणून त्यांचा लौकिक होता. दादा जरी जहाल समाजवादी आणि मार्क्सवादी असले तरी हैद्राबादच्या लढयातील सगळीच माणसे त्यांच्याकडे गप्पागोष्टीसाठी येत. सरकारदरबारी वजन असणाऱ्या सरकारपक्षीय हिंदूंचे नेते जुन्या हैद्राबाद संस्थानात वेंगल व्यंकट रामारेड्डी, आर्वामदु अय्यंगार इत्यादी लोक होते. दादा अय्यंगाराचे ज्युनिअर म्हणून ती मंडळी येत. काँग्रेसमधील मवाळांचे नेते त्यांच्याकडे येतच. मार्क्सवादी नसणारे जहाल येत. गोविंदभाई, आदी समाजवादी जहाल येतच. काँग्रेस सोशॅलिस्ट मंडळी येत. काँग्रेसमधून बाहेर पडलेले कम्युनिस्टही येत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे वर्गमित्र म्हणून इत्तेहादु मुसलमानचे तरुण नेते जे पुढे निजामच्या मंत्रिमंडळात गेले, ते म्हणजे रऊफ महमद आणि यामिन जुवेरी हेही येत. यामुळे दादांचे घर हा राजकीय अड्डा होता. पिछाडीच्या अनेक गोष्टी या बैठकीत चर्चिल्या जात. अनेक मुद्दे या बैठकीतून बाहेर पडत. आमच्या मामी जर शिकलेल्या आणि राजकारणाच्या अभ्यासू असत्या तर हैद्राबादच्या राजकारणाचा अर्धा इतिहास त्यांनी या घरात बसून नोंदविला असता. स्वातंत्र्योत्तर काळातल्या राजकारणात दादांनी कधी रस घेतला नाही. स्वातंत्र्यासाठी ज्या पिढीने किंमत मोजली, पण पुढच्या सत्तेविषयी जे उदासीन राहिले त्या पिढीचे दादा भाग होते.
 अशा या लोकविलक्षण पुरुषाची पत्नी होण्याचे भाग्य आमच्या सीतामामींच्या