पान:वाटचाल (Vatchal).pdf/25

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अभिवादन : २५

मातब्वरी वाटत नसे. संस्कृत भाषा राष्ट्रभाषा व्हावी हा विचार स्वप्नातही त्यांना पटला नसता. वस्तुतः ते मराठीसह संस्कृतचेही एम. ए. होते. उलट आधी संस्कृतचे एम. ए. झाले, नंतर मराठीचे. महाभारताशी ते दीर्घकाल मैत्रीने जगत होते; पण राष्ट्रभाषा म्हणजे हिंदी आणि महाराष्ट्रात सर्वत्र मराठी हा त्यांचा आग्रह सुटला नाही. अण्णांचे एक मित्र कानडी होते. त्यांची पत्नी महाराष्ट्रीय होती. तिच्या मुलांची मातृभाषा मराठीच असणे रास्त आहे असे अण्णांना वाटे आणि जर पत्नी कानडी असती आणि पती महाराष्ट्रीय असता तरीही मुलांची भाषा मराठीच राहिली पाहिजे असा आग्रह अण्णांचा राहिला असता. मराठीवरच्या या उदंड प्रेमातून व अभिमानातून त्यांनी 'मायबोलीची कहाणी' लिहिली. जात्यावरील ओव्या गोळा करण्यात काव्याची ओढ प्रभावी होती. पण त्यापेक्षा मराठीची माया अधिक प्रभावी होती ही गोष्ट मान्य केली पाहिजे. मराठ्यांच्या इतिहासाविषयी त्यांना असाच अभिमान होता. पुन्हा एकवार भीमथडीच्या घोड्यांनी अटकेचे पाणी प्यावे, काबूलचा हुरडा परसात भाजला जावा असे त्यांना मनापासून वाटत होते. पण मराठ्यांच्या इतिहासापेक्षा अधिक अभिमान त्यांना मराठी संतांचा व मराठी भाषेचा वाटे.
 अण्णा कुणी परमेश्वर होते असे खासच आम्हाला वाटत नाही. त्यांचा सनातनीपणा, त्यांचा श्रद्धाळूपणा, त्यांची शैली, त्यांची मते पुष्कळदा आम्हाला उघड चुकीची वाटत. मुक्तेश्वर-मोरोपंतांच्या तुलनेत कल्पनाविलासातसुद्धा मोरोपंत वरचढ आहेत हे त्यांचे मत मला कधीच पटले नाही. परळी संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना 'शिवपूजा मुळात सूर्यपूजा असावी' असे मत त्यांनी दिले आहे. त्याही वेळी मला ते चुकीचे वाटले, आजही चुकीचे वाटते. अण्णांच्या मर्यादा, त्यांच्या उणिवा यांकडे डोळेझाक करण्याइतके आम्ही त्यांचे अंधभक्त कधीच नव्हतो. पण शेवटी त्यांच्या समोर मराठवाड्यातल्या सर्वांचा माथा नम्र होई. त्यांच्या जबर व्यासंगामुळे, विद्वत्तेमुळे आम्ही भारावलेले होतो. अजूनही भारावलेले आहोत. पण यापेक्षा महत्त्वाचे असे स्थान नांदापूरकरांचे मराठवाड्यात मी मानतो, ते स्थान म्हणजे मराठवाड्यातील साऱ्या मराठी चळवळीचे प्रचंड उगमस्थल अण्णा होते. अण्णांचा प्रचंड शिष्यसंभार केवळ अण्णांचाच विद्यार्थी नव्हता. त्यांना नांदापुरकरांखेरीज इतरही प्राध्यापक शिकवत असतील, पण अभिमानाने सारेजण परंपरा नांदापूरकरांची सांगतात. पोलिस ॲक्शननंतर मराठवाडा साहित्य परिषद तर अक्षरशः नांदापूरकरमय झाली. परिषदेच्या सर्वच लहानमोठ्या कार्यकर्त्यांचे अण्णा साक्षात गुरुवर्य होते. आणि ज्यांचे ते गुरू नव्हते तेही त्यांना गुरुस्थानीच मानीत. माढेकर, पोहनेरकर ही मंडळी दुसऱ्या प्रकारची मानली तर कहाळेकर, भगवंत देशमुख, कानिटकर ही मंडळी पहिल्या प्रकारची मानावी लागते. अण्णा हे