पान:वाटचाल (Vatchal).pdf/24

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

२४ : वाटचाल

मोजून पाहण्याची त्यांची जिद्द असे. त्यांचा सारा प्रबंध या मोजून पाहण्याच्या जिद्दीचा एक नमुना आहे. विद्वान म्हणत, “ मोरोपंत हा अधिक संस्कृतप्रचुर आहे." अण्णांनी एकूण पाच पर्वातील एकूण शब्द मोजले. मुक्तेश्वरात तत्सम शब्दांचे प्रमाण त्यांना मोरोपंतांपेक्षा अधिक आढळले. त्यांनी मुक्तेश्वर हा शैलीच्या दृष्टीने अधिक संस्कृतप्रचुर आहे ही गोष्ट निश्चितपणे सिद्ध केली आहे. प्रबंधात सगळी मिळून ही चर्चा आठ-दहा ओळींत आटोपते. पण यासाठी महिनोगणती अण्णा मोजदाद करीत होते. शिस्तशीर, बारीक, तपशीलवार विश्लेषण व त्याची अतिशय अनाग्रही चिकित्सा हे अण्णांच्या प्रबंधाचे महत्त्वाचे गुण होते. पण एकदा अभ्यास संपला आणि अण्णा त्यांच्या ज्ञानक्षेत्राच्या वर्तुळातून बाहेर आले म्हणजे त्यांच्याइतका सश्रद्ध कोणी नसे. आम्ही परीक्षा पास व्हावी म्हणून ते नवससुद्धा करीत. चिकित्सकपणा आणि श्रद्धाळूपणा, सनातनीत्व आणि औदार्य, जिद्द, ताठरपणा, आक्रमकपणा आणि हळवेपणा, अत्यंत तुसडी भाषाशैली, कुचकेपणा आणि गाढ वात्सल्य या परस्परविरोधी गुणांचे नांदापूरकर हे चमत्कारिक मिश्रण होते. हीच गोष्ट त्यांच्या वाचनात होती. अण्णांना रांगडेपणा आवडे. रांगड्या मराठवाडी बोलीत ठाशीवपणे ते बोलत. ग्रांथिक भाषा त्यांच्या तोंडी नव्हती. मराठवाडी बोलीलाच ते शुद्ध मराठी मानीत. कोल्हापुरी चप्पल घालून रप्प रप्प आवाज करीत ते वेगाने चालत. आमच्या चालण्याला 'दिल्ली चाल' म्हणत. तरुणपणी ते कुस्त्या खेळले होते. म्हातारपणापर्यंत किंबहुना मरेपर्यंत कुस्त्या पाहण्याचा त्यांना शौक होता. ते डिटेक्टिव्ह कादंबऱ्यांचे, गुप्तहेर कथांचे, चाहते वाचक होते. शेकड्यांनी गुप्तहेरकथा त्यांनी वाचल्या असतील. पण त्यांच्या मते नाजूकपणा हेच वाङमयाचे खरे सौंदर्य आहे. सूक्ष्म, भावूक, नाजूक, उदात्त, भव्य यांवर ते वाङ्मयात लुब्ध होत. कर्कश, भडक त्यांना आवडत नसे. केशवसुतांपेक्षा त्यांना तांबे आवडत. बालकवी तर फारच आवडत. टागोर आणि खलिल जिब्रान यांच्यावर त्यांची माया होती. स्त्रियांच्या ओवी-वाङ्मयात जीवनाच्या शेवटच्या काळात ते पूर्णपणे बुडून गेले होते. या स्त्रीगीतांतील नाजूक भावाविष्कारावर ते पूर्णपणे लुब्ध होते. महाभारत आणि त्याची भव्यता, जात्यावरच्या ओव्या आणि त्यांचा नाजकपणा या गोष्टीत रमणान्या माणसाला कुस्त्या आणि गुप्तहेरकथा यांचे विलक्षण आकर्षण असावे हा एक पुन्हा विरोधाभासच होता.
 मराठीवर त्याचे अतिशय ज्वलंत प्रेम होते. त्यांच्या कवितांच्या स्फूट संग्रहातील तेहतिसाव्या पानावरील कविता अगर ४५ व्या पानावरील कविता या केवळ कविता नाहीत. अगदी आरंभीची कविता तर आता मराठी गीत म्हणून साहित्य परिषदेच्या सर्व कार्यक्रमात वापरली जाते. या कवितांतून व्यक्त झालेला अभिमान नांदापूरकर प्रत्यक्ष जगत होते. मराठीच्या या अभिमानापुढे त्यांना संस्कृतचीही