पान:वाटचाल (Vatchal).pdf/23

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अभिवादन : २३

न करता पारोशाने ते कधी भारताच्या पोथीला शिवले नाहीत. या मुद्दयावर त्यांनी एकदा मला घरातून बाहेर काढले होते. लहानपणापासून मी धार्मिकतेची चेष्टा करणारा जडवादी होतो. अण्णा म्हणाले, "जा, रे नरहरी, चप्पल घेऊन ये. पट्टे लाल आण. इतर रंगाचे नकोत." मी गेलो. त्यांच्यासाठी चप्पल विकत आणली. पट्टे मात्र काळ्या रंगाचे आणले. ते मला म्हणाले, " आचार्य, नांदापूरला या रंगाला काळा म्हणतात. कुरुंद्याला हाच रंग लाल म्हणतात काय ?" मी सांगितले, " चपलांचा रंग काळा आहे, पण तो मुद्दामच तसा आणला आहे." अण्णा म्हणाले, “मला लाल रंग हवा.” मी म्हणालो, "लाल चप्पल आणणार नाही. तुम्ही लाल पाहिले की हात जोडता, पाया पडता. तुम्हांला लाल म्हटले की देव वाटतो." अण्णा भयंकर रागावले. "माझ्या धार्मिकतेची, श्रद्धेची चेष्टा करतोस- हो माझ्या घराच्या बाहेर " असे ते म्हणाले. मी म्हटले, " ठीक आहे." आणि मी घराबाहेर जाऊन उभा राहिलो. अण्णांनी सर्वांना ताकीद देऊन बजावले, " त्याला घराबाहेर काढले आहे, पुन्हा या घरात तो दिसला न पाहिजे." पंधरा एक मिनिटे मी घराबाहेर होतो. पुढे तेच घराबाहेर येऊन मला म्हणाले, " मूर्खा, उन्हात काय उभा राहतोस ? तुला चांदणे आणि ऊन यातील फरक कळत नाही? तुझ्यापेक्षा गाढव बरे. चल, आत हो." पण शेवटी चप्पल काळी राहिली. लाल चपलेचा हट्ट अण्णांनी सोडला. यात जय माझा झाला असे त्या वेळी मला वाटले. खरा जय अण्णांच्या गाढ वत्सलतेचा होता असे आज वाटते. अण्णांनी सखाराम महाराजांवर आरत्या व अष्टके रचली आहेत. सकाळी उठून ते या आरत्या कधी कधी म्हणत. पण त्यांच्या वाङ्मयात या श्रद्धाळूपणाचा मागमूसही नाही. आपल्या प्रबंधात महाभारताची जी कठोर तर्कशुद्ध चर्चा त्यांनी केली आहे ती पाहताना हा माणूस श्रद्धाळू असेल असे म्हणावेसे वाटत नाही. भारताचा अभ्यास करताना नेहमीचा प्रश्न द्रौपदी पाचांची पत्नी झाली हा येतो. द्रौपदी इंद्राणीचा अवतार होती. सर्व पांडव इंद्राचे अंश होते. म्हणून ती पाचांची पत्नी झाल्यासारखी दिसते तरी खरोखरी ती एकाचीच होती. ही भूमिका अण्णांनी उत्तरकालीन प्रक्षेप मानली आहे. आदल्या जन्मी शंकराने पाच वेळा द्रौपदीला 'तथास्तु' म्हटले; म्हणून तिला पाच पती झाले अगर कुंतीने " ती पाचात वाटून घ्या" म्हटले; म्हणून ती पाचांची पत्नी झाली या भूमिका, अण्णांना प्रक्षिप्त वाटत. ते म्हणत, "द्रौपदीला पाहून धर्मासकट सर्वांचे मन तिच्या सौंदर्यामुळे विचलित झाले होते. द्रौपदी कुणाही एकाची झाली असती तर पाचांची एकजूट मोडली असती. पाचांची पत्नी झाल्यामुळे द्रौपदी हे पांडवांच्या एकजुटीचे महत्त्वाचे कारण व साधन ठरले." महाभारतातील हा आशय सांगणारे स्पष्टीकरण मूळचे आहे असे त्यांना वाटे. अण्णा एकदा अभ्यासात शिरले, म्हणजे अत्यंत शिस्तशीर व चिकित्सक असत. प्रत्येक गोष्ट