पान:वाटचाल (Vatchal).pdf/22

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

२२ : वाटचाल

फार चेहऱ्यावर कठोरपणाचा छापही होता. त्यांचा देखणेपणा त्यांच्या एकाही चित्रात दिसत नाही. अण्णांचा फोटो असा का येतो याविषयी मला नेहमी आश्चर्य वाटे. मी एकदा त्यांना विचारले, " अण्णा, आमचे फोटो आम्ही आहोत त्यापेक्षा कितीतरी चांगले येतात." अण्णा म्हणाले, " सज्जनांचा फोटो कॅमेऱ्यात बिघडतो."
 अण्णांच्या स्वभावात श्रद्धा आणि चिकित्सा, सनातनित्व आणि सुधारणावाद यांचे मोठे चमत्कारिक मिश्रण होते. निदान तीन तरी प्रेमप्रकरणे अण्णांच्या छायेखाली घडली आहेत. एके वेळी मुलगा यजुर्वेदीय आणि धाकटा होता. मुलगी ऋग्वेदी, कऱ्हाडी, वयाने वडील होती. आपली शाखा सोडून लग्न करणे या गोष्टीचा अण्णांना भयंकर राग येई. त्यामुळे हे प्रेम त्यांना मनातून पटत नसे. ते आम्हांला सांगत, हे बरोबर नाही. तुम्ही दोघांचीही समजूत घातली पाहिजे. आणि परंपरा पाळण्यास मंडळीला शिकवले पाहिजे. आम्ही उत्तर देत नसू. आम्ही एकदा त्यांना सांगितले, या दोघांना बोलत बोलत घरी जावयाचे असते. मुलीला घरापर्यंत सोडण्याला निमित्त मिळावे म्हणून तुम्ही सहाला शिकवयाला बसा. साडेसातला शिकवणे बंद करा. अण्णा त्या प्रेमी जीवांना संधी मिळावी म्हणून पुष्कळदा शिकण्यासाठी पाचलाच घरी बोलवीत. व मग 'मी थोड्या वेळाने शिकवतो, तोपर्यंत तुम्ही बाहेरच्या कोठडीत बोलत बसा' म्हणून सांगत. शिकवणे संपल्यावर जाताना मुलाला आज्ञा देत, “ तसाच बेजबाबदारपणे सरळसोट घरी जाऊ नकोस. हिला सांभाळून घरापर्यंत सोड. रात्रीबेरात्री बाईने एकटे जाऊ नये." मंडळी बाहेर गेली म्हणजे मला बोलवून फैलावर घेत व जे घडते आहे ते कसे बरोबर नाही हे विस्ताराने समजावून सांगत. अण्णांचे एक विद्यार्थी तर मराठा होते. त्यांच्या प्रेयसीच्या बापाने त्यांना घरी न येण्यास बजावले होते. ते अण्णांकडे येत, पायाशी बसत व हळूच डोळे पुसत. अण्णा या आपल्या लाडक्या विद्यार्थ्याला दोनचार शिव्या देत. शेवटी वह्या तपासण्यासाठी या प्रेयसीला स्वतःच्या घरी बोलवीत. नंतर दोघांनाही समोर बसवून प्रेम करणे कसे बरोबर नाही, हे समजावून देत. अण्णा मनाने सनातनीच होते. पण प्रेमी जीवांना धर्मासाठी प्रेम सोडा, परंपरेसाठी जीवनातले माधुर्य गमवा हे सांगण्याची त्यांची इच्छा नव्हती. ते आमच्यावर कुरकुरत. माणसाची निष्ठा, त्याची उत्कटता, त्याचा प्रामाणिकपणा अण्णांना तेवढ्यापुरते पुरोगामी करी. कारण अण्णा हळवे होते. दिसेल त्या देवाला नमस्कार करण्याइतके ते श्रद्धाळू होते. लोणीच्या सखाराम महाराजांवर त्यांची श्रद्धा होती. दर शनिवारी ते मारुतीला जात. देवपूजा रोज करीतच. दरमहा घरी सत्यनारायण असे. दर शुक्रवारी उपवास करीत. दरमहा चतुर्थी असे. शिवाय मोठया एकादशा, श्रावणी सोमवार हेही करीत. श्रावणी न चुकता करीत. ईश्वरावर त्यांची श्रद्धा होती. भारताच्या सहवासात त्यांच्या जीवनातील पंचवीस वर्षे गेली, पण अंघोळ