पान:वाटचाल (Vatchal).pdf/13

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

माझी आई : १३

आइच्या प्रश्नांत तथ्य आहे, असे मला वाटू लागले आहे. मध्यमवर्गीय संसारात व्यसन असो वा बाहेरख्यालीपणा असो, तो खर्च परवडत नाही. मग घरच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष होते आणि घरची सारी कर्तव्ये नीट सांभाळणारांना बाहेरचे नाद परवडत नाहीत. नवरा दोन्ही वेळ कुरकुर न करता नीट पोटभर जेवत असेल व बिनचूक घरी झोपत असेल तर संसार सुरळीत आहे, असे आता मलाही दिसू लागले आहे. आईची व्यावहारिक गणिते, परंपरेने आलेले व अनुभवाने पारखलेले ज्ञान सांगतात. आमची सगळी मते व ती मांडण्याच्या पद्धती अतिशय पुस्तकी आहेत.
 माझी आई पक्की आस्तिक, धर्मश्रद्ध आणि सनातनी. सगळ्या भाकडकथांवर तिचा पक्का आणि प्रामाणिक विश्वास आहे. तो आता बदलणार नाही. नारळात पाणी देव घालतो असे तिचे पक्के मत आहे. वनस्पतिशास्त्रज्ञ तिची समजूत घालू शकत नाही. पण इतकी धर्मश्रद्धा असूनही ती कर्मठ नाही. व्यापक समंजसपणा तिच्यात उपजत आहे. आम्ही मुले लहान होतो. तिच्या सोवळ्याच्या स्वयंपाकातच आम्ही वावरत असू. नागड्या मुलाला विटाळ नाही, असे तिचे म्हणणे असे. पुढे आम्ही मोठे झालो, आणि नैवेद्यापूर्वीच खाण्यास मागू लागलो. ती नैवेद्य वाढून ठेवी आणि आम्हास वाढी. लेकराचे हट्ट माणसाला कळतात, मग देवाला का कळणार नाहीत, असे तिचे म्हणणे असे. नंतर आम्ही तरुण झालो. सोवळेओवळे पाळीनासे झालो. तिचे म्हणणे असे की, पटणाऱ्याने पाळावे, न पटणाऱ्याने पाळू नये. सर्व व्रते, कुलाचार यांतून आम्हाला हवी ती सूट मिळते. तिचे सनातनत्व बदलत नाही. आम्हांला त्याचा त्रासही नसतो. उलट तिची मर्जी सांभाळण्यासाठी आम्ही थोडेसे तिच्या कलाने वागलो तरी ते कौतुकाला पुरते. हा नाइलाज नाही. अगतिकता नाही. कारण अजून ती स्वामिनी आहे. मानी व रागीट तर आहेच. हा समंजसपणा आहे.
 मी प्रेमविवाह केला. मुलगी वेगळया पोटशाखेची. मुलगी अगदी गरीब घरची. तेव्हा लग्न मुलाच्या बापाने घरचे पैसे खर्च करून केले. आई सर्व लग्नात उत्साहाने हौसेने वावरत होती. मुलाचे सुख म्हणजे आपले सुख. त्याने आपली बायको निवडली तर निवडली. सुखाने नांदा म्हणजे झाले. माझ्या लग्नाच्या वेळी मी बेकार व फक्त मॅट्रिक होतो. लग्नानंतर क्रमाने पदवीधरही झालो. पगारदार प्राचार्यही झालो. आईला त्याचे कौतुक आहेच. पण ते सांगण्याची पद्धत अशी की, माझी सून मोठी भाग्याची. सगळा पायगुण तिचा आहे. माझ्या पत्नीप्रमाणेच आईचेही मत असे आहे की, सून व्यवहारी, चतुर, शहाणी म्हणून संसार चालतो. " नाहीतर हा. ह्याला व्यवहार काही कळत नाही. नेसूचे फेडून दान करायचे व उघड्या मांड्यांचा अभिमान धरायचा." यांपैकी तिची खरी मते किती, सुनेला