पान:वाटचाल (Vatchal).pdf/12

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१२ : वाटचाल

या बाबी, माझ्या आईला वारा वाहतो, अग्नी पोळतो, माणसाला भूक लागत यासारख्या स्वाभाविक वाटतात. आपल्या मुलांवर आपण प्रेम करतो हा मुद्दा तिच्या बोलण्यावागण्यात येत नाही. प्रेम ह्या शब्दापेक्षा कर्तव्य हा शब्द तिला परवडतो. प्रेस हास्यास्पद वाटते. मुलगा शिकण्यासाठी परगावी पाठवत नाही असे म्हणणारी आई, मुलाच्या अकल्याणाचे काही त्याच्या हट्टाखातर करणारी, मुक्या हट्टाला बळी पडणारी आई, या सर्व स्त्रिया प्रेमळ आहेत असे न मानता लेकराच्या दुश्मन आहेत, असे तिला वाटते.
 मी वयाच्या नवव्या वर्षापासून मामांच्याकडे वाढलो. मी सुट्टीत घरी आलो की तिचा उत्साह उचंबळून येई. माझ्याभोवती मित्रांचे कोंडाळे असायचे. या मित्रांचेही फराळपाणी, जेवणखाण ती करायची. पण पुन्हा शिकण्यासाठी मी निघालो की ती हसतमुखाने निरोप देई. रात्रंदिवस माझ्या आठवणीने ती बेचैन असणार. तिची अनेक मुले वारली तेव्हा सर्व मायेचा आधार मीच होतो. पण ते कधी ती दाखविणार नाही. तिचे डोळे पुसणे, पाणी गाळणे आमच्या नजरेमाघारी असे. तशी ती फार हळवी आहे. आपली मुलगी सासरी पाठविताना तर सोडाच, पण गल्लीतील मुलगी सासरी निघाली तरी तिचे डोळे पाणवतात. पण ते सारे थोडक्यात आवरणार. कधी कधी अनपेक्षितपणे एखादे वाक्य ती बोलते, तेव्हा सगळा हळवेपणा उघड होतो. मध्येच ती म्हणते, " अरे, तीन लेकरांचे काय ? सर्वांना पोटभर होईल इतकी माया माझ्याजवळ होती." कधी मध्येच ती म्हणते. " खूप सोसले बाळा, आता लेकरांनी गवताची काडी मोडू नये असे वाटते." पण असे प्रसंग फार विरळ. सामान्यपणे ती प्रसन्न असते.
 आईचे म्हणणे असे की, स्त्रिया करावी म्हणून मुलांच्यावर माया करीत नाहीत, तर त्यांना माया केल्याविना राहवतच नाही. आपल्याला राहवत नाही. आपण माया करतो. मुले मोठी होतात. माया पुढे धावते. पाणी खोलगटपणाकडेच धावणार. मुले आपल्या मुलावरच प्रेम करणार. माय-बापाविषयी थोडी लोकलाज, थोडी कृतज्ञता, थोडे कर्तव्य. पण प्रेम अपेक्षू नये. न मिळाल्याची कुरकुर करू नये.
 तिची काही व्यावहारिक गणिते आहेत. तुझे नवऱ्यावर प्रेम आहे का? नवऱ्याचे तुझ्यावर प्रेम आहे का? असे फालतू प्रश्न ती कुणा स्त्रीला विचारणार नाही. ती विचारते, घरच्या किल्ल्या तुजजवळ आहेत ना? खाण्यापिण्याबद्दल तर काही तक्रार नाही ? नवरा कपडेलत्ते नीट घेतो ना? नवरा मागितलेले पैसे देतो ना ? रोज झोपायला घरी येतो ना? नवरा जर इतके करीत असेल तर मग सारे काही ठीक आहे, असे ती मानते. नवरा भांडतो, नवरा बोलत नाही, नवरा उशिरा घरी येतो या तिच्या मते फालतू गोष्टी आहेत. नवशिक्षण घेतलेल्या माझ्यासारख्या आधुनिकाला तिचे हे अडाणीपण फार खटकत असे. आता मीही प्रौढ झालो आहे.