पान:वाटचाल (Vatchal).pdf/10

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१० : वाटचाल

माझ्या आईचा जेव्हा मी मानसशास्त्रदृष्टया विचार करतो तेव्हा मला असे वाटते की, स्वत:लाही नकळत कोणत्यातरी उल्हास-उत्साहाने ती झपाटलेली असावी. दोन्ही वडील बहिणी संसारात विफलच ठरलेल्या होत्या. आपणास संसार करण्याचे हे भाग्य मिळाले, हा आनंद मनसोक्त भोगावा, असे काहीतरी तिला वाटत असणार. तिच्या व्यक्तित्वाची संगती 'कष्टाळू' या कल्पनेत नीट सामावत नाही. कारण कष्टाची इतकी गरज नव्हती. हौस, उत्साह यांचा कुठेतरी उलगडा करता यायला हवा. आजच्या तरुण पिढीविषयी आई म्हणते, " या पोरी तरुणपणीच म्हाताऱ्या झालेल्या दिसतात. आम्ही कशा विंचवासारख्या तरतर पळत होतो." तिच्यापुरते हे म्हणणे खरे आहे. सगळ्या पिढीविषयी मात्र मला शंका आहे.
 खरे म्हणजे, आईच्या वाट्याला कमी दुःख आलेले नाही. तिला एकूण अकरा अपत्ये झाली. सहा मुले, पाच मुली. यांपैकी आम्ही तिघे, म्हणजे मी, एक भाऊ व बहीण तेवढी हयात आहोत. आठ अपत्यांचा मृत्यू तिने बघितला आहे. यांतील एकजण तर तीन-चार वर्षांचा होऊन वारला. अपत्यांचे लागोपाठ मृत्यू होत गेले. माझ्या आधी एक मुलगी झाली ती जन्मतः वारली. वडील दोन बहिणींचे मरण तिने पाहिले होतेच. पण हा अपत्यमृत्यू तिला अधिक जाणवला असणार. मी दुसरा. माझ्या पाठोपाठ चार अपत्ये क्रमाने गेली. बहीण आहे ती अनेक नवसांची व अनेक व्रतांची. ती व्रते आई जन्मभर पाळणार. त्याबद्दल तिची तक्रार नाही. शेवटची तीनही अपत्ये वारली. एवढ्या मोठया दुःखाची चव तिने पचविली. मूल आजारी असताना अमाप खस्ता ती खात असेलच. मूल वारल्यावर दोन-चार दिवस शोकाचे जात. पण मृताच्या चिंतनात ती कधी गढली नाही. देवाने जी अपत्ये वाचविली त्यात ती तृप्त आहे. अपत्यमत्यखेरीज इतरही दुःखे असतातच. ती अपरिहार्य असतात. माझे आजोबा, आजी, दोन मामा, माम्या, माझा मावसा, असेही मरणाचे चक्र आहे. पण कोणत्याही दुःखाने ती खचली आहे, कोमेजून गेली आहे, असे कधी घडले नाही. कष्ट करण्याची अफाट शक्ती तशी दुःख पचविण्याचीही अफाट शक्ती तिच्यात देवाने तिला दिली आहे. आमच्या घरात दुःख उगाळण्याची सवय कुणालाच नाही.
 तिच्या अभिमानाचा मुख्य स्रोत म्हणजे आमचे बाबा. जुन्या काळी स्त्रीच्या सर्व सुख, आनंदाचे निधान तिचा पती असे. आईचेही तसेच आहे. पती सदोष असला तरी बायका त्याचा अभिमान ठेवतात. इथे तर पती गुणवान होता. नवरा चारित्र्यसंपन्न, कर्ता व निर्व्यसनी आहे; त्याच्या आधारे आपण निर्धास्त आहोत: आपल्याला काही कमी नाही; तो आपल्या मोह प्रेमात आहे ; आपण त्याला आवडतो; ही मुख्य जाणीव, आणि मुलगा आहे, मुलगी आहे, ही दुसरी जाणीव. या दोन सुखांत ती अशी पोहत राहिली की सर्व दुःखे तिने पचवून टाकली.