पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/99

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मला वाटत राहिलं की येथून पुढे पंढरीच्या वारीसाठी जाणाऱ्या दिंड्यांतील पालखीत ज्या सकल संत गाथा असतात त्यात येथून पुढे 'सारे रान' ही 'शेतकरी गाथा' ठेवायला हवी. माझा जन्म व जीवन दोन्ही पंढरीशी जोडलेलं आहे. मी पाहात आलो आहे की पंढरपूर ही 'शेतकऱ्यांची भावभक्ती-राजधानी' होय. पेरणी व कापणीच्या उसंतीनंतर क्रमशः येणाऱ्या आषाढी, कार्तिकी वारीत पायधूळ झाडणारा शेतकरी आषाढीत पेरलेलं पदरी पडू दे म्हणून आळवणी करतो अन् कार्तिकीत पदरी पडलं, भरून पावलो म्हणून आभार मानायला येतो. या सर्व कृषी संस्कृतीचा लेखाजोखा, तपशील, हिशोब, जमाखर्च नि त्याबरोबर पाचवीला पुजलेली कर्जाची साडेसाती व निसर्गाचं लहरीपण सर्व रानवाटांच्या कहाण्यांनी ओसंडून राहणारी कविता बांधांशी वैर करणाऱ्या तरुण शेतकरी पोरा-पोरींनी वाचायला हवी तरच शेतीचं दैन्य, दारिद्रय सरेल.

 'सारे रान'ला प्रा. एकनाथ पगार यांची सुदीर्घ आस्वादक प्रस्तावना आहे. ती त्यांनी सार्थ नि सरस शब्दांत उतरून या कवितांचा भावार्थ सटीक समजावला आहे. यातील 'पीकपाणी' मधील कविता शेतकरी नि त्याचे आप्तस्वकीय यांच्या भावबंधांचे हृद्य वर्णन होय. 'नक्षत्र पेरले माये, ते क्षत्र निघाले वांझ'चा विषाद यात आहे. 'दूर राहिला गाव' म्हणजे शेत-शिवारातील उघडझाप होय. 'पेटला वणवा। जळता हे माती, हिरवीशी नाती। करपली...' चा टाहो इथे घुमतो आहे. 'पेरा'तील कविता कृषी संस्कृतीच्या पीकपालटाचा आग्रह आहे धरणारी म्हणून पुरोगामी. शेतकरी संघटनेचे नि इंद्रजित भालेराव यांचे जीवाभावाचे नाते आहे. एके काळी विदर्भ, मराठवाड्यातील प्रत्येक शेतकरी मेळावा इंद्रजित भालेरावांच्या गाण्याने सुरू व्हायचा. हजारो शेतकरी एकसुरात नि टाळ्यांच्या ठेक्यावर 'काट्या कुट्यांचा तुडवित रस्ता। माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता।' ही कविता समूहगीत म्हणून गायचे. शरद जोशींच्या भाषणांनी मेळावा संपायचा. एकदा तर शरद जोशींनी इंद्रजितच्या कविता ऐकून हंबरडा फोडला होता. 'टाहो' ला जागतिकीकरणानंतर शेतीच्या उभ्या पिकात घुसलेल्या बियाणं, भाव, सहकार, सरकार नामक रानडुकरांचा उच्छाद नि विध्वंस आहे. इथं कर्नाटक, आंध्र, पंजाब, मालवभूमी, बंगाल असा फेर धरत ही कविता शेत-शिवाराचा राष्ट्रीय पट मांडून 'आयत्या बिळावर पायतं सरण। गावाचं झालं जागतिकीकरण' असं वास्तव चित्रित करते. 'मुलूख माझा' म्हणजे मराठवाड्याचं अंतरंग चित्रण होय. यातील कवितांवर जनाई, मुक्ताई, बहिणाईची झाक-झापड दिसते. 'वेचलेल्या

वाचावे असे काही/९८