पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/91

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

केज बर्ड सिंग्ज', देव पेल्झरचे ‘ए चाइल्ड कॉल्ड 'इट' आणि मॅक्झिम गॉर्कीचे 'माय चाइल्डहुड' ही आत्मचरित्रे 'शब्द' इतकीच वाचनीय आहेत. सार्त्रने हे आत्मचरित्र अनेक वर्षे खपून लिहिलं. यात वयाच्या ११ व्या वर्षांपर्यंतचे बालपण आहे. सार्त्रचा जन्म सन १९०५ चा. त्याचे वडील सार्त्रच्या जन्मानंतर लगेच वारले. आई अ‍ॅना मारीने त्याचा सांभाळ केला. आईचं माहेर म्हणजे श्वाइट्झर घराणं. या घराण्याला धर्मोपदेशकांची मोठी परंपरा. सार्त्र हा जगविख्यात समाजसेवी अल्बर्ट श्वाइटझरच्याच घराण्यातला. घरी वडील, आजोबांची मोठी ग्रंथसंपदा. ग्रंथ वाचतच सार्त्रचं बालपण सरलं खरं, पण पोरकेपणात नि एकटेपणात. पुस्तकांनी सार्त्रला जगाचा परिचय करून दिला. सार्त्रचे शिक्षण पॅरिसमध्ये झाले. एकोल नॉर्मल सुपेरियर या नामवंत शिक्षण संस्थेत तो शिकला. (मी पॅरिसमध्ये असताना सार्त्रसाठीच तिला भेट दिल्याचं आठवतं!) येथूनच तो पदवीधर झाला. इथेच त्याची मैत्री सिमॉन द बोव्हारशी झाली. तिच्याबरोबर तो आयुष्यभर लग्न न करताही एकनिष्ठ व एकत्र राहिला. 'लिव्ह इन रिलेशनशिप' या दोघांमुळे जगभर मान्य झाली. सिमॉन द बोव्हार प्रसिद्ध फ्रेंच कादंबरीकार होती. त्यांचा 'द सेकंड सेक्स' हा ग्रंथ जगभर गाजला. त्या ग्रंथाने स्त्रीला जगभर समानता मिळवून दिली.

 'शब्द' आत्मचरित्राचे दोन भाग आहेत - (१) वाचन (२) लेखन, सार्त्रच्या म्हणण्यानुसार आपण लहानपणी जे वाचतो, त्याचा अर्थबोध होत नसतो. पण आकर्षण नक्कीच निर्माण होते. त्या आकर्षणातून नंतर जे वाचत राहतो, ते कळत राहते. लेखनही असेच दोन प्रकारचे असते. एक सहेतुक लिहिलेले व दुसरे असते मुक्त. मुक्त वाचनाप्रमाणे मुक्त लेखन श्रेष्ठ, सार्त्रनी यात लिहिलंय की वयाच्या चौदाव्या वर्षांपर्यंत मी वाचन, लेखनाशी खेळत राहिलो. नंतर माझा शब्द खेळ गंभीर जसा झाला तसा तो सुंदर होत गेला. सार्त्रना लेखनाने, शब्दांनी आत्मभान दिले. शालेय वयात सार्त्र हा उपेक्षित, वंचित बालकाचे जीवन जगला. उपेक्षेने त्याला एकांत दिला. तो सर्वसाधारण बुद्धीचा मुलगा. घरी पोरका म्हणून दुर्लक्षित तर शाळेत सामान्य बुद्धीचा म्हणून उपेक्षित. दोन्ही वंचनांमध्ये त्याने आपला मिळालेला अवकाश वाचन, विचाराने भरून काढला व प्रौढपणी त्याचे रूपांतर लेखनात केले. मानसशास्त्र, तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात सार्त्रनी लेखन करून गरीब, वंचितांबद्दल जगात कणव निर्माण केली. 'अस्तित्ववाद आणि मानवतावाद' (१९४६) हे त्याचे गाजलेले पुस्तक. सार्त्रने कादंबरी, नाटक,

वाचावे असे काही/९०