पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/73

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नंतर अंगावर घेऊन शेती करू लागले. तिथे त्यांनी गुलामगिरी प्रथा निर्मूलनाचे कार्य केले. निरक्षर असलेल्या तोताराम सनाढ्य यांनी आपली रामकहाणी सतत १५ दिवस हिंदीतील सुविख्यात लेखक बनारसीदास चतुर्वेदी यांना सुनावली. त्यांनी ती शब्दबद्ध करून प्रकाशित केली. ते हिंदीतील विदेशात जीवन कंठलेल्या भारतीय माणसांचं पहिलं आत्मकथन. त्याचं ऐतिहासिक महत्त्व आहे. ते पुस्तक 'भारत गौरव' गोपाळ कृष्ण गोखले, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, लोकनायक जयप्रकाश नारायण (तेव्हा ते तरुण होते!) यांच्या वाचनात आले. ते पुस्तक गुलाम, वेठबिगार म्हणून मॉरिशस, फिजी, दक्षिण आफ्रिका, त्रिनिदाद, मलेशिया इत्यादी देशांत गेलेल्या भारतीय बांधवांवरील इंग्रज अत्याचारांची गाथा म्हणून जगभर प्रसिद्ध झाले. त्यातून राष्ट्रीय काँग्रेसने गुलामगिरी प्रथा निर्मूलनाची मागणी केली व इंग्रजांना वेठबिगार मजूर पाठवण्यास बंदी घालण्यात आली. त्या पुस्तकाचे नाव आहे, "फिजीद्वीप में मेरे २१ वर्ष'. अनेक वृत्तपत्र, मासिकांनी त्या वेळी या पुस्तकावर अग्रलेख लिहून इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरुद्ध रान उठवले व रणशिंगही फुकले ते हे पुस्तक!

 भारतातून वेठबिगार विदेशी जाण्याची प्रथा तशी जुनीच आहे. ती सोळाव्या शतकापासून दिसून येते. असे वेठबिगार पहिल्यांदा भारताबाहेर गेले ते मद्रास बंदरातून. ते तमिळ होते. अशा जाणाऱ्या वेठबिगारांना 'कुली' म्हणून ओळखलं जायचं. तमिळ भाषेत कुली शब्दाचा अर्थ आहे मजुरी. मजुरीवर जाणारे ते मजूर. ईस्ट इंडिया कंपनीने भारतात व्यापार सुरू केला सुरतमध्ये वखार स्थापून. ते वर्ष होते इ. स. १६१२. पण वास्को द गामा भारतात आल्यापासून म्हणजे सन १४९९ पासून हे सुरू झालं. विसाव्या शतकाच्या प्रारंभी औद्योगिकीकरणाला गती आली. कमी श्रमात अधिक उत्पादन मिळण्याचे क्षेत्र म्हणून ब्रिटिशांनी शेतीकडे पाहिले. वसाहती मोफत मिळविल्या तसे त्यांना मजूरही मोफत मिळाले. गुलाम विक्री प्रथा बंद झाली सन १८०६ मध्ये. मग ब्रिटिशांनी नामी युक्ती शोधून काढली. भारतातल्या तुरुंगातले कैदी त्यांनी हक्काचे गुलाम म्हणून वापरायला सुरुवात केली. सन १८१५ ते १८२० या पाच वर्षांत ब्रिटिशांनी असे २५००० कैदी मॉरिशसमध्ये नेले. हा त्यांच्या लेखी बिनभांडवली उत्पन्न मिळविण्याचा 'दिव्य प्रयोग' (ग्रेट एक्सपरीमेंट) होता. गुलाम प्रथा निर्मूलनाचा कायदा सन १८३३ मध्ये मंजूर झाल्यावर इंग्रजांनी करारबद्ध मजुरी पद्धत सुरू केली. गरीब नाडलेल्या माणसांना करारात बांधून घेऊन ते विदेशात घेऊन

वाचावे असे काही/७२