पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/67

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ओरडून काही सांगते आहे ('सांगत्ये ऐका'च म्हणा ना!) असं चित्र छापलं. तिचं नाव होतं बेलिंडा ब्लर्ब. तिच्या नावाने मलपृष्ठ मजकूर 'ब्लर्ब' म्हणून ओळखला जातो. हे ग्रॅहम बेलसारखंच. त्यानं फोनचा शोध लावला. ट्रायल म्हणून पहिला फोन आपल्या प्रेयसीला केला होता. तिचं नाव होतं 'हॅलो'. जगातले सर्व जण फोन उचलला की 'हॅलो' म्हणतात. जणू काही पलीकडची व्यक्ती आपली प्रेयसीच. (गंमत म्हणून नरेंद्र मोदी ट्रंप साहेबाला 'हॅलो' म्हणूनच संवाद सुरू करतात!)

 पुस्तकांना अनुक्रमणिका कशी सुरू झाली? परिशिष्टं कशी जोडली गेली? मराठीत कोश कसे सुरू झाले? जगातलं महाग पुस्तक कोणतं? मानधन नाकारणारा पहिला लेखक कोण? ग्रंथ पुरस्कार कसे सुरू झाले? जप्त पुस्तकं कोणती? 'ग्रंथ-तुला' कशी सुरू झाली? मराठीत स्वस्त पुस्तकांचा जमाना कसा सुरू झाला? पुस्तक प्रदर्शनाद्वारे ग्रंथ विक्री कुणी व कशी सुरू केली? अ‍ॅडव्हान्स बुकिंग (पुस्तकांचे) कसे सुरू झाले? या नि अशा अनेक शंकांचं समाधान करणारे हे पुस्तक नावाने जरी 'ग्रंथगप्पा' असलं, तरी प्रत्यक्षात मात्र ती आहे 'ग्रंथ-बखर'च.

 मराठीत 'ग्रंथगप्पा'सारखी अनेक पुस्तके आहेत. 'ग्रंथसनद' हे युनेस्कोच्या 'दि बुक चार्टर'चा अनुवाद होय. हे पुस्तक वाचन अधिकार, ग्रंथ शिक्षण, निर्भय सर्जनशीलता, प्रकाशन अभिरुची, ग्रंथालय, संदर्भ ग्रंथांचे आंतरराष्टीय आदान-प्रदान इत्यादी संबंधी मूलभूत भूमिका विशद करते. 'ग्रंथक्रांती' पुस्तक ग्रंथ विकास विस्ताराने समजावते. 'ग्रंथवेध' मध्ये मराठी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ग्रंथांचा परिचय मिळतो. 'आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने' अशी ओळ असलेला अभंग नुसता भिंतीवर टांगून काय उपयोग?

 'ग्रंथगप्पा' पुस्तक ग्रंथांसंबंधी माहिती देत जीवन समजावतं. म्हणजे असं की एके काळी मुलगी लग्न होऊन सासरी निघाली की शहाणी आई मुलीच्या रुखवतातून 'रुचिरा', 'अन्नपूर्णा', 'सूपशास्त्र', 'गृहिणी-मित्र' सारखी पुस्तके आवर्जून देत असे. नववधू एका हातात पुस्तक व दुसऱ्या हातात झारा, चमचा, डाव, उलथणे, रवी, चिमटा, पातेली, तवा, कढईच्या कसरती करत नवऱ्याबरोबर सासूचं मन जिंकायचा प्रयत्न करत असायची. सन्मान्य अपवाद वगळता बहुसंख्य सुनांना सासूचं मन जिंकता आलं असं इतिहासात ऐकिवात नाही. अशा या पुस्तकांचा रंजक इतिहास वाचक भगिनींनी मूळ पुस्तकातूनच वाचला पाहिजे.

वाचावे असे काही/६६