पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/62

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ईशान्य भारतातील सशस्त्र उठाव, पंजाबातील 'ऑपरेशन ब्लू स्टार', 'कारगीलचे युद्ध' यांचे वार्तांकन केले आहे. तसेच अनेक पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्या विदेश दौऱ्यात व अन्य शिष्टमंडळांतून अनेक देशांचा दौरा केल्याने त्यांना जगाचा इतिहास, भूगोल व नागरिकशास्त्र चांगलेच माहीत असल्याचे पुस्तक वाचताना जाणवत राहते. भारतीय शासन रचना, कार्यपद्धतीचे त्यांचे निरीक्षण व नोंदी वाचकास एका नव्याच जगात घेऊन जातात.

 भारत स्वतंत्र झाला. जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाले. त्यांनी परराष्ट्र मंत्रालय आपल्याकडेच ठेवले होते. पुढे ही परंपरा अनेक पंतप्रधानांनी पाळली. आपले पंतप्रधान कार्यालय, संरक्षण मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय हे तिन्ही एकाच राजवाडा शोभेल अशा इमारतीत आहे. त्या इमारतीचं नाव 'साउथ ब्लॉक'. त्या समोर आहे 'नॉर्थ ब्लॉक'. तिथे आहे गृह आणि वित्त मंत्रालय. या दोहोंच्या मध्ये आहे राष्ट्रपती भवन. आणिबाणीत देश क्षणात सूत्रे हलवतो त्याचे हे रहस्य. सगळ्या राष्ट्रांचे दूतावास जिथे आहे तो भाग 'चाणक्यपुरी' म्हणून ओळखला जातो. 'दूतावास' पाहात असताना लक्षात येते की ते त्या देशांचे आपल्या देशातील किल्लेच.

 कोणत्याही देशाचं सामर्थ्य आज शस्त्रांपेक्षा त्या देशाच्या कूटनीतीवरून ओळखलं जातं. भारत हा शांतीप्रिय देश असला, तरी त्याचे राजदूत सर्व देशात आहेत. हा विभाग शिष्टाचार प्रवीण मानला जातो. या विभागाचा संबंध व संपर्क थेट त्या देशांचे पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्यापर्यंत असतो. राष्ट्रप्रमुखांच्या भेटी, दौरे ठरवणे सोपे पण शिष्टाचार पाळणे अवघड. कारण प्रत्येक देशाची भाषा, पोषाख, खानपान, परंपरा, शिष्टाचार वेगळे. जगातील सर्व भाषा येणारे दुभाषी सर्व राष्ट्रांकडे असतात. कार्यक्रमात मिनिटांचं नव्हे सेकंदांचं महत्त्व. विशेष म्हणजे परराष्ट्र मंत्रालयाचे कार्य देशाच्या वेळेपेक्षा आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेप्रमाणे चालते. आपले परराष्ट्र अधिकारी, राजदूत त्या त्या देशांचे झाले तरच ते यशस्वी होतात. राजशिष्टाचारात आगमन, स्वागत, सलामी, बैठका, भेटी, भोजन, शिष्टमंडळ चर्चा, करार, निवास, वाहन व्यवस्था ते थेट पाहुणा परत स्वदेशात सुखरूप पोहोचेपर्यंतची काळजी घेणे सर्वांचे भान राखावे लागते. त्यात थोडी कसूर म्हणजे त्या राष्ट्राचा अपमान समजण्यात येतो. या सर्वांचे प्रशिक्षण परराष्ट्र अधिकाऱ्यांना दिले जाते. आपल्या देशात असलेल्या परदेशी राजदूत, अधिकारी, पत्रकारांना हवी ती माहिती देण्याबरोबरच ते देशविरोधी काही कार्य, कृती, प्रचार, हेरगिरी तर करत नाही ना यावर

वाचावे असे काही/६१