पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/58

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

माजले', 'श्रावणमासी हर्ष मानसी', 'आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक', 'हा हिंद देश माझा', 'उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले' या बालकविता माहीत नाही असा मराठी माणूस विरळा. असं काही आहे या कवितांमध्ये? तर काही नाही, त्यात आपलं सारं जीवन सामावलेलं आहे. महाराष्ट्रातील पहिलं मराठी पाठ्यपुस्तक 'वाचनमाला' बनवलं पहिले ब्रिटिश शिक्षणाधिकारी मेजर टॉमस कँडी यांनी. मराठी भाषेत विरामचिन्हांचा वापरही त्यांनीच सुरू केला. 'बालमित्र' त्यांच्याच काळात सुरू झालं. अव्वल इंग्रजी काळापासून ते स्वातंत्र्य मिळेपर्यंत आपल्याकडे विविध मराठी पाठ्यपुस्तके प्रकाशित झाली. पूर्वी ती आजच्या महाराष्ट्राशिवाय गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेशच्या मराठी मुलखात शिकवली जात असत 'नवयुग वाचनमाला', 'नवभारत वाचनमाला', 'मंगल वाचन' अशी ती पुस्तके होती. आज 'बालभारती', 'कुमारभारती', 'युवकभारती' आहेत, पण गंमत अशी की शंभर वर्षे उलटून गेली तरी वर सांगितलेल्या बालकवितांना मरण नाही. त्याचं कारण या बालकविता मराठी साहित्य आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे.

 पाठ्यपुस्तके आपण जेव्हा शिकत असतो, तेव्हा तो परीक्षेचा अभ्यास असतो हे खरे आहे. पण त्या अभ्यासातून आपल्या मनाची घडण केव्हा नि कशी होते ते आपणास कळत नाही. 'मंगल देशा! पवित्र देशा! महाराष्ट्र देशा!' कविता अर्थासह आपण लहानपणी पाठ करतो. प्रश्नांची उत्तरे लिहितो पण त्यातून राज्यातला उंच ध्वज आपल्या गावी फडकला पाहिजे अशी ऊर्मी, महत्त्वाकांक्षा निर्माण होते, त्याचं बीजारोपण बालपणी म्हटलेल्या महाराष्ट्र गीतात असते. मराठीत राम गणेश गडकरी, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, यशवंत, सुरेश भट प्रभृती मान्यवर कवींनी महाराष्ट्र गीते लिहून आपल्यामध्ये प्रांताभिमान रुजवला आहे. 'कोंबडा', 'पेरील जे शेतकरी नाही', 'इरलेवाली', 'सुगी', 'नंदीबैल', 'हिरवे तळकोकण' सारख्या कवितांमधून शहरी विद्यार्थ्यांना कृषी संस्कृतीचे कष्ट कळतात म्हणून शेतकरी आत्महत्येने ते कासावीस होतात. 'आई', 'तान्हाभाऊ', 'श्रावणबाळ' कविता नातेसंबंध दृढ करत आपल्यात कर्तव्यभावना रुजवते. 'दसरा', 'दिवाळी', 'होळी' कविता सण समजावतात. 'भोवरा', 'पतंग', 'चेंडू', 'खेळ', 'गोफण' कविता खेळातून जीवनसंस्कार देतात. विशेष म्हणजे हे सारं कळतं ते समज आल्यावर. बालपणीच्या पाठ केलेल्या कविता आयुष्यभर पिच्छा पुरवत, पाठलाग करत कानात घोंगावत राहतात म्हणून आपण सुसंस्कृत, सभ्य राहतो.

वाचावे असे काही/५७