पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/55

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

माणसांचा बसवेश्वरांना तिटकारा नि तिरस्कार होता. अशा लोकांना त्यांनी आपल्या वचनात 'शब्दसूतकी' म्हटले आहे. अशा लोकांना ते 'रौरवनरकवासी' म्हणजे टोकाचे वाह्यात संबोधले आहे. 'क्रियेविन वाचाळता व्यर्थ आहे' हेच त्यांना अशा वचनांतून समजवायचे असायचे. पूर्वी धर्म आणि दान हे परस्परपूरक होते नि आहेपण. परंतु प्रदर्शनार्थ दान अथवा हेतू ठेवून केलेले दान बसवेश्वर निषिद्ध मानत. लोक अन्नदान, वस्त्रदान, धनदान करतात. पण या महात्म्याने 'त्रिकरणशुद्ध' शब्द वापरून निरपेक्ष सेवेचे महत्व अधोरेखित केले आहे. वीरशैव शरण लिंगायती असतात. लिंगस्पर्शी हात किती महत्त्वाचे असतात, हे समजून सांगताना त्यांनी एका वचनात म्हटले आहे, "लिंगास स्पर्श केलेला हात सत्कारार्थ राखीव.' म्हणजे एकदा का तुम्ही शरण झालात मग तुम्हास दुष्कृत्य करण्याचा अधिकारच उरत नाही. तुम्ही निरंतर सदाचारी राहणे बंधनकारक. अशा प्रकारे संत बसवेश्वरांनी आपल्या धर्मीय बांधवांना सदाचारी बनवले.

 लिंगायत धर्मातील वचन साहित्याचा प्रारंभ मानण्यात येतो. वचन साहित्यात अबिंगर चौडय्या, अक्कमहादेवी, अल्लमप्रभू, उरिलिंग पेद्दी, काडसिद्धेश्वर, गजेश मसणय्या, जेडर दासिमय्या, तोंटद सिद्धलिंगेश्वर प्रभृती संतांनी मोलाची भर घालत वचन साहित्य समृद्ध केले आहे. ते बाराव्या शतकापासून विकसित होत आलेले आहे. या वचन साहित्यातूनच लिंगायत मततत्वे उदयाला आली आहेत. या 'वचन सिद्धांत सार' ग्रंथाच्या आधारे सुमारे अडीचशे वचनकार आजवर होऊन गेले. त्या सर्वांच्या वचनांचा हा संग्रह असल्याने त्यास धर्मग्रंथाचे महत्त्व प्राप्त झाले आहे. मध्ययुगात सर्वच धर्मांमध्ये कर्मकांडाचे स्तोम माजले होते. त्यास छेद देत ज्या संत कवींनी धर्मशुद्धी मोहीम उघडली व ज्यांनी कर्मकांडापेक्षा आत्मिक शुद्धता व मनःपूर्वक भक्ती महत्त्वाची मानली अशा रामानुजाचार्य, मध्वाचार्य श्रेणीत बसवेश्वरांचा समावेश केला जातो. त्यांनी धर्माबरोबर राजकीय परिवर्तन घडवून आणले हे विशेष. या धर्मक्रांतीत वचन साहित्याचा सिंहाचा वाटा होता. गेल्या शतकातही गुब्बी मलहण नामक वचनकाराने लिहिलेला 'गणभाष्यरत्नमाला' (सन १९०५) सारखा महत्त्वपूर्ण ग्रंथ उदयाला आला. यातूनही वचन साहित्याची निरंतरता व अखंडता लक्षात येते.

 कुराण', 'बायबल', 'श्रीमद्भागवत', 'अवेस्ता', 'वचनसिद्धांत सार', 'समयसार', 'त्रिपिटक' इत्यादी धर्मग्रंथ इस्लाम, ख्रिश्चन, हिंदू, पारशी, वैश्य, जैन, बौद्ध इत्यादी धर्माचे प्रातिनिधिक साहित्य म्हणून ओळखले

वाचावे असे काही/५४