पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/54

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बसवेश्वरांप्रमाणेच त्यांचे विचार क्रांतिकारी होते म्हणून तर प्रतिगामी विचाराच्या हिंसक हल्ल्याचे ते बळी ठरले. 'वचन सिद्धांत सार' नावाचे मूळ कन्नडमध्ये असलेल्या या महाग्रंथाचा मराठी अनुवाद प्रा. आर. एम. करडीगुद्दी यांनी केला आहे.

 संत बसवेश्वरांना भारतीय समाजातील जातमूलक विषमता, उच्चनीचता मान्य नव्हती. म्हणून त्यांनी तत्कालीन चातुर्वण्यांचा विरोध केला. बसवेश्वरांच्या लेखी सारी माणसे समान होती. त्यांच्या या उदार आणि व्यापक दृष्टिकोनामुळे त्यांच्या धर्माला विविध जात आणि वर्णातील अनुयायी लाभले. बसवेश्वर आंतरजातीय खानपान व्यवहाराचे जसे समर्थक होते, तसेच ते आंतरजातीय विवाहांनाही प्रोत्साहन देत असत. 'वचन सिद्धांत सार' मध्ये संत बसवेश्वरांची जी वचने आहेत, ती आदर्श मानव धर्माचीच तत्त्वे होत. सत्य बोलावे, चोरी करू नये, हिंसा नको, ज्ञानी तो श्रेष्ठ, व्यभिचार वर्ज्य, सभ्य वर्तन, स्त्रिया, दलितांचा आदर, सहनशील वर्तन इत्यादी तत्वे म्हणजे मानव प्राण्याप्रती आस्थाच. शरण (भक्त) विषयक त्यांचे विचार व आचारही पूज्य भाव व्यक्त करणारा असायचा.

 सत्य बोलावे, बोलल्यागत वागावे.
 असत्य आचरण करून प्रमाद करणाऱ्या
 संसारी माणसास नको म्हणे, कूडलसंगमदेवा.

 संत बसवेश्वरांनी जी वचने लिहिली आहेत त्यात स्वतःसाठी चेन्नबसवण्णा शब्दाचा वापर केला असला तरी तो सर्वसकट वचनांत येत नाही. ईश्वरासाठी ते कूडलसंगमचा वापर करतात. तो शब्द स्थलदर्शकही आहे. धर्माचरण म्हणजे सत्याचरण अशी महात्मा बसवेश्वरांची धारणा होती. बसवेश्वर अत्यंत स्पष्टवक्ते होते. ही पारदर्शिता त्यांच्या वचनांमध्येही प्रतिबिंबित झालेली आढळते-

 एकसारखा 'मी करतो' म्हणून उंच झेंडा
 फडकवून करणाऱ्या भक्ताचे घर
 म्हणजे भाईणीचे घर.

 शरणाने विनम्र असावे, अहंकारी असू नये. 'मी' पणाचा त्याग केल्याशिवाय आपणास ज्ञानी होता येणार नाही, हे संत बसवेश्वर आपल्या भक्तांना परोपरीने सांगत असत. 'ठकाला तोंडामध्ये शेपूट असते' अशा आशयाचे त्यांचे प्रसिद्ध वचन आहे. त्यातून ते 'कुत्रा' आणि 'माणूस' यांच्यातील व्यवहाराचे अंतर आणि फरक समजावतात. बोलघेवड्या

वाचावे असे काही/५३