पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/5

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वाचन छंद मन करी धुंद!

 दैनिक लोकमत, कोल्हापूरच्या आवृत्तीसाठी सन २०१७ मध्ये लिहिलेल्या सदराचे, 'वाचावे असे काही' हे ग्रंथ रूप होय. याच नावाने हे सदर चालले होते. वाचन चोखंदळ व्हावे, वाचन संस्कृती समृद्ध व्हावी, श्रेष्ठ पण विविधांगी ग्रंथांचा परिचय देऊन वाचन चतुरस्र बनावे या उद्देशाने केलेले हे लेखन. नवं, जुनं वाचन वाचकांपुढे ठेवले गेले. वाचकांचा यास उदंड प्रतिसाद लाभला. ही वाचन न लोपल्याची खूण होय. माहिती व संपर्क क्रांती, संपर्क साधन विकास, संगणक प्रचार व प्रसार, जागतिकीकरणातून आलेली आत्मरतता व व्यस्तता या सर्वांनी वाचनाचा पूर्वावकाश व शिळोप्याचा वेळ भौतिक सुख व आभासी समाज जीवनास समर्पित केला. त्यामुळे वाचन वेळाचा झालेला संकोच ही वर्तमानातील खरी समस्या होय. वाचन लोपले नसले, संपले नसले तरी आखडले आहे हे निश्चित. यावर नकारात्मक चर्चा करण्यापेक्षा सकारात्मक पर्याय देण्याच्या उद्देशाने झालेले हे लेखन. त्याच्या ग्रंथरूपामुळे या लेखनास 'चोखंदळ वाचनाचा मार्गदर्शक' असे आलेले रूप हा पश्चात परिणाम होय. हे ठरवून केलेले लेखन नसले तरी ते ज्या पद्धतीने झाले त्यातून पूर्वी असलेला वाचन छंद नव्या काळातील वाचकांना ध्येयधुंद करत ग्रंथान्वेषी बनवेल, चोखंदळ वाचक बनवेल असा विश्वास वाटल्यावरून केलेला हा ग्रंथोद्योग.

 'अक्षर दालन'मुळे हा योग! त्यामुळे अमेय जोशींचे आभार! दैनिक लोकमतचे संपादक श्री. वसंत भोसले व मुख्य वार्ताहर श्री. विश्वास पाटील यांची कल्पना म्हणून हे लेखन घडले नि पुस्तक आकारले.

दि. ११ जानेवारी, २०१८
-डॉ. सुनीलकुमार लवटे
 

वि. स. खांडेकर जयंती.