पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/46

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पाहिले, वाचले असेल त्यांना कल्पना येईल की एखाद्या व्यक्तीविषयी तुमच्या मनात आदर व प्रेम असल्याशिवाय अशा कलाकृती आकाराला येत नाहीत, चर्चित 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या चित्रात्मक चरित्राचे सारे शिल्पकार विजय सुरवाडे होत. या ग्रंथात 'शोध डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या छायाचित्रांचा' शीर्षक त्यांचे प्रास्ताविक वाचले की यातील एक एक चित्र, संदर्भासाठी त्यांनी घेतलेले कष्ट अभिनंदनास खचितच पात्र ठरतात. सदर ग्रंथास संपादक व सुविख्यात कवी, समीक्षक वसंत आबाजी डहाके यांचे पन्नास पानी संपादकीय म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन, कार्य, विचारांचे विहंगमावलोकनच होय. या ग्रंथ निर्मितीच्या काळाचा मी जिवंत साक्षीदार असल्याने या सर्वांचे त्यामागे उपसलेले कष्ट मी जाणतो. विजय सुरवाडे यांनी तर आपल्या आयुष्याची ३०-३५ वर्षे याच कामी खर्ची केली आहेत, हे आपण लक्षात घ्यायला हवे.

 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' हे सचित्र चरित्र असले तरी त्यात केवळ चित्रे नाहीत. त्यात जन्मदाखला, शाळेची रजिस्टर मधील नोंद, शाळेचे हजेरी पत्रक, नोकरीचे मस्टर, बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांचे शिष्यवृत्ती मंजुरी पत्र, दरबारचे हुजूर हुकूम, राजर्षी छ. शाहू महाराजांचे पत्र, कोलंबिया विद्यापीठ गुणसूची, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या पावत्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चालविलेल्या 'मूकनायक', 'बहिष्कृत भारत', 'जनता', 'समता', 'प्रबुद्ध भारत' वृत्तपत्रांच्या पहिल्या अंकाची छायाचित्रे, महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाच्या दिवाणी दाव्याची कागदपत्रे, निकालपत्र, 'पुणे करार', महात्मा गांधी-डॉ. आंबेडकर पत्रव्यवहार, विविध निवेदने, जाहीरनामे, आवाहन-पत्रे, हे सारे पाहात, वाचत असताना आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात त्यांच्याबरोबर जगत असल्याची वाचक, प्रेक्षकाला येणारी जिवंत प्रचिती हे या सचित्र चरित्राचे खरे यश होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधींना प्रथमतः दि. १४ ऑगस्ट, १९३१ रोजी मणीभवन, मुंबई येथे भेटले होते. तेव्हा त्यांनी स्पष्ट शब्दात महात्मा गांधींना सांगितले होते की, "आपण म्हणता मला देश आहे. पण मी पुन्हा सांगतो की मला देश नाही. ज्या देशात कुत्र्याच्याही जिण्याने आम्हाला जगता येत नाही, कुत्र्या-मांजराला मिळू शकतात तेवढ्या सवलती ज्या देशात आम्हाला गुण्या-गोविंदाने मिळत नाहीत त्याला माझा देश व माझा धर्म म्हणण्यास मीच काय पण ज्याला माणुसकीची जाणीव झाली आहे व ज्याला स्वाभिमानाची चाड आहे असा कोणताच अस्पृश्य तयार

वाचावे असे काही/४५