पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/42

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कॉम. झाले. त्यांना सनदी अधिकारी व्हायचं होतं. पण दरम्यान कोल्हापुरात रत्नाप्पा कुंभार यांनी सुरू केलेल्या कॉलेज ऑफ कॉमर्सचे तत्कालीन प्राचार्य भा. शं. भणगे यांनी शरद जोशी यांना आपल्या कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून बोलावून घेतले. ते त्यांचे 'सिडनॅम'चे विद्यार्थी. प्रा. शरद जोशी त्या वेळी पद्मा टॉकीजमागे असलेल्या पदमा गेस्ट हाउसमध्ये राहात. पगार दोनशे रुपये. खाणावळ मासिक तीस रुपये. तांबडा-पांढरा रस्सा हवा असल्यास पाच रुपये अधिक मोजावे लागत.

 स्पर्धा परीक्षेत ते उत्तीर्ण झाले. पण गुणांकानुसार त्यांना पोस्ट खात्यातच नोकरी मिळाली. एका अर्थाने त्यांनी वडिलांचीच गादी चालवली. दिल्लीत उच्चपदस्थ नोकरीमुळे त्यांना फ्रान्सला प्रशिक्षणास जावे लागले. तिथे त्यांची बुद्धिमत्ता पाहून त्यांना युनोच्या स्विट्झर्लंडमधील युनिव्हर्सल पोस्टल युनियनमध्ये नोकरी मिळाली. १९६८ ते १९७६ अशी आठ वर्षे नोकरी करून ते भारतात परतले ते शेती करण्यासाठी हे आज सांगितले तर कुणास खरेही वाटणार नाही. आज आपल्या सर्व कृषी महाविद्यालये, विद्यापीठांमधील सन्माननीय अपवाद वगळता तद्दन सर्व विद्यार्थी युपीएससी, एमपीएससी करून शेत, शिवार, बांधावर जाण्याऐवजी शासकीय अधिकारी होणेच पसंत करतात. या पार्श्वभूमीवर शरद जोशी यांचे शेतकरी होणे वेगळी अंगारवाट तुडवणेच होते.

 स्विट्झर्लंडहून परतलेले शरद जोशी पुण्यात स्थायिक झाले. पुण्यापासून चाळीस किलोमीटर अंतरावरील चाकण रस्त्यावरील आंबेठाण गावी वीस- पंचवीस एकर जमीन खरेदी केली. 'अंगारमळा' त्याचे नाव ठेवले. ते पहिल्याच प्रयोगात हात पोळल्यामुळे.

 शेती करणे आजही भारतात आतबट्ट्याचे का याचा अनुभव शरद जोशींना पहिल्या पिकाच्या पट्टीतच आला. त्याचं असं झालं की लवकर येणारे व रोख पैसे देणारे पीक म्हणून शरद जोशींनी खीरा जातीच्या काकडीचे पीक घेतले. तीन महिन्यात सहा पोती काकड्या निघाल्या. अडत्याकडे पाठवून दिल्या. विक्रीचा खर्च वजा जाता १८३ रु. मिळाले. दुसरे पीक परत काकडीचेच घेतले. तेव्हापण दीडएकशे रुपये मिळाले म्हणून तिसरे पीकही काकडीचेच घेतले. अडत्याकडे बिल आणायला गेले. त्यांनी ३२ रु. येणे असे बील हाती ठेवत पैसे मागितले. वाहतूक, हमाली, दलाली, वजनकाटा, मार्केट कमिटी चार्ज, मुख्यमंत्री फंड वजा जाता ३२ रु. येणे

असा हिशोब अक्कल खाते पदरी आल्याने शेतकरी शरद जोशी यांना

वाचावे असे काही/४१