पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/34

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गौरव ग्रंथ सिद्ध केला आहे. मूळ ग्रंथाच्या दुप्पट पाने यात आहेत. शिवाय अनेक लेख व अन्य मौलिक सामुग्रीची यात भर घातल्याने त्या ग्रंथास नव ग्रंथाचे रूप आले आहे. या नव्या आवृत्तीत खण्ड - २ मध्ये राजर्षी शाहू महाराजांच्या व्यक्ती, विचार, काळ व कार्य या पैलूंवर प्रकाश टाकणारे नवे ४१ लेख असून ते या गौरवग्रंथासाठी म्हणून अनेक मान्यवरांकडून मुद्दाम लिहून घेतलेले आहेत. काही मूळ गौरव ग्रंथ प्रकाशित करताना राहून गेलेले महत्त्वपूर्ण लेख या ग्रंथात समाविष्ट करण्यात आले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सर एस. एम. फ्रेझर, डॉ. रा. चिं. ढेरे, रा. ना. चव्हाण, प्रा. नरहर कुरुंदकर, कॉम्रेड गोविंद पानसरे प्रभृती मान्यवरांची नावे या संदर्भात उल्लेखनीय ठरतात. यामुळे राजर्षी शाहू छत्रपतींची ओळख एका जातीत बंदिस्त न होता ते 'सकल जनांचा आधारू' बनून पुढे येतात. 'Profets are ahead of their time' अशा अर्थाचे जे विधान आहे ते या नव्या खंडामुळे सार्थ ठरले असून संपादक डॉ. रमेश जाधव त्याबद्दल अभिनंदनास पात्र आहेत. या खंडात तीन पिढ्यांचे लेखक एकत्र आल्याने राजर्षी शाहू चरित्र हे त्रिकालाबाधित श्रेष्ठ ठरले आहे.

 सदर नव गौरव ग्रंथात 'आम्ही पाहिलेले शाहू महाराज' अशा शीर्षकाने एक पुस्ती जोडली आहे. त्यात श्रीमंत क्षात्रजगदगुरू, चित्रतपस्वी भालजी पेंढारकर, कवी ग. दि. माडगूळकर, डॉ. बाबा आढाव, संपादक अरुण टिकेकर प्रभृती मान्यवरांनी दिलेले योगदान वाचनीय ठरले आहे. यात ७५ दुर्मीळ छायाचित्रे दिली आहेत. ती पाहताना शंभर वर्षांपूर्वीचा वैभवी कालखंड जिवंत होतो. नव ग्रंथात अत्यंत दुर्लभ वंशावळ, कागदपत्रे, हकूम, जाहीरनामे संग्रहित असल्याने या ग्रंथाचे संदर्भ मूल्य असाधारण झाले आहे. विशेषतः या ग्रंथात समाविष्ट जे सामाजिक कायदे आहेत, त्यावर नजर फिरविताना लक्षात येते की प्रख्यात चरित्रकार धनंजय कीर शाहूकालीन संस्थानाचे वर्णन 'दुःखितांचे मातृगृह' म्हणून का करायचे. या ग्रंथात 'जंगी पैलवानांचे मल्ल युद्ध' ही जाहिरात, शाह मिल्सच्या शेअर्सचे छायाचित्र, कोल्हापूर संस्थानचा रंगीत नकाशा, शाहू पुतळ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सन १९३९ साली संपन्न दलित परिषदेच्या निमित्ताने केलेले अभिवादन छायाचित्र आपल्या आजोबांच्या (छत्रपती राजाराम महाराज) समाधीचे फ्रोरेन्स (इटली) मधील दर्शन (इथे मी जाऊन आलो आहे!) हे सर्व पुनःप्रत्ययाचा आनंद देणारे अविस्मरणीय क्षण! ते

टिपून संग्रहित करण्याची संपादक डॉ. रमेश जाधव यांची सव्यसाची दृष्टी

वाचावे असे काही/३३