पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/31

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गायिले. त्यात कोण कोण होते माहीत आहे - सुरेश वाडकर, पद्मजा फेणाणी, हरिहरन, श्रीधर फडके, शौनक अभिषेकी, अवधूत गुप्ते, विठ्ठम उमप, देवकी पंडित, अजय-अतुल, सलील इ. ही असते सुरेश भटांच्या प्रतिभेची ताकद! सुरेश भटांच्या किती गीतांना हृदयनाथ मंगेशकरांनी चाली लावल्या नि ती गीते लता मंगेशकर, आशा भोसलेंनी गायिली. या सर्वांमागच्या या चरित्रातील हकिकती मुळातून वाचणे म्हणजे त्या काळाचे आपण साक्षीदार होणे. ही किमया करणारे चरित्रकार प्रदीप निफाडकर कच्चा गुरुचे चेले नव्हेत याची साक्ष चरित्रातील कितीतरी आठवणी देतात. ते वाचताना वाचक शहारतो. या चरित्रात सुरेश भटांचे काव्य वृत्त, शब्द सौंदर्य, आशय, विषय, अलंकार, काव्यप्रकार, रस इ. अंगांनी समजून सांगण्याचा चरित्रकाराने केलेला खटाटोप म्हणजे गुरूप्रती आस्था, आदर, प्रेम आणि त्यापलीकडे जाऊन निस्सीम भक्ती!

 चरित्रकार प्रदीप निफाडकरांनी कल्पकतेने दिलेले अर्धे शीर्षक पूर्ण करायचे म्हणून सांगेन की सन १९८३-८५ च्या दरम्यान सुरेश भटांचे वास्तव्य काही कारणामुळे कोल्हापुरात होते. सुरेश भटांना रिक्षातून फिरायचा छंद होता. रिक्षा नवी लागायची. रिक्षात टेपरेकॉर्डर असणे पूर्वअट होती. शिवाय त्यांनी निवडलेली रिक्षा मिटरवर न पळता दिवसाच्या ठरवलेल्या भाड्यावर चारी दिशा पळत रहायची. त्यांना खाण्या-पिण्याचा शौक होता. अख्खी क्वार्टर एका घोटात रिचवणारे सुरेश भट जीवनाचं सारं जहर विरघळावं म्हणून आसुसलेले असायचे. आतल्या आत खदखदणारा हा विशालकाय कवी अंतर्मनाने मात्र मधाळ होता. त्यांचं ज्यांच्याशी पटलं नाही, अशांनी त्यांची भलामण (की निर्भर्सना) 'करपलेला झंझावात' म्हणून केली असली तरी हा कवी काही येरागबाळा नव्हता की लेचापेचाही! देवाचे देवाला नि सीझरचे सीझरला देण्याचा रोखठोक व्यवहार त्यांनी कशाचीही तमा न बाळगता निभावला. मराठी कवितेस गझलेचा साज चढविणारा हा कवी. त्यास 'त्याने एक नवोदित कवी पिढीस नादाला लावले' म्हणून काहींनी नाके मुरडली खरी. पण 'आज मी जे गातो ते उद्या गातील सारे' असा आत्मविश्वास त्यांच्यात होता. म्हणून पु. ल. देशपांडे यांनी लिहून ठेवले आहे की, 'तिचं निळेपण नि निराळेपण दोन्ही लक्षात राहण्यासारखं आहे.' हा कवी किती संवेदनशील होता, त्याचं एकच उदाहरण देऊन मी थांबतो.

 कोल्हापुरात ते साळोखेनगरमध्ये भाड्याने घर घेऊन राहिले होते.

वाचावे असे काही/३०