पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/30

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अजुनी, राजसा निजलास का रे?' म्हणून विचारणारी विराणी सुरेश भटांचीच असते. सुन्या मैफिलीतून ते झपाटलेल्या झंझावातापर्यंतच्या प्रत्येक प्रसंगाचे गीत गाणारे सुरेश भट, त्यांनी काय नाही लिहिलं? अभंग, भूपाळी, स्फूर्तीगीते,भावगीत, भावकविता, गझल, हझल (वक्रोक्ती पूर्ण गझल), हायकू, लावणी, पोवाडा यांसह काही मुक्तकही! असे असले, तरी त्यांच्या कवितेचा आत्मस्वर गझलच होता. हा तसा मूळ उर्दू काव्यप्रकार. पण भटांनी कधी त्याची भ्रष्ट नक्कल नाही केली. उर्दू गझलेला त्यांनी मराठी शब्दमंत्राचा साज चढवला. गझल म्हणजे शब्दांचा प्रमेय आणि अर्थाचा व्यत्यास! शब्द नि अर्थाचं अद्वैत हे तिचं सौंदर्य! अशा सुरेश भटांचं चरित्र मराठीत नसावं हे कुणास सांगून खरे वाटणार नाही. पण ती एक वस्तुनिष्ठ नामुष्की होती खरी। सुरेश भटांचे शिष्य प्रदीप निफाडकर यांनी गुरूदक्षिणेची उतराई करत तिची भरपाई केली. 'गझलसम्राट सुरेश भट आणि...' असं अधुरं शीर्षक लाभलेलं हे चरित्र म्हणजे सुरेश भटांची बंडखोर, संयमी, धाडसी आणि तरल जीवनकहाणी होय.

 अपूर्ण शीर्षक ल्यालेल्या ग्रंथात सर्व जाणकारांनी भर घालून ते पूर्ण करावे अशी चरित्रकाराची अपेक्षा आहे. हे पुस्तक रूढ अर्थाने चरित्र असले तरी तो व्यापक अर्थाने सुरेश भटांच्या कवितेचा समीक्षा ग्रंथही बनला आहे.पण त्यापेक्षा या ग्रंथात सुरेश भटांच्या आठवणींचा जो खजिना आहे,त्यास ज्वालामुखीच म्हणायला हवे. म्हणजे असे की एकेक आठवण म्हणजे सुतळी बाँबचा स्फोटच! हा कवी नुसता कवी नव्हता. कलंदर कलाकार नि बिलंदर पत्रकार, पण त्यांनी झिजवलेली लेखणी पाहू लागू तर लक्षात येते की सुरेश भटांना राजकारणाची चांगली जाण होती. महाराष्ट्राने अनुभवलेले दोन 'साहेब' सुरेश भटांची लेखणी लीलया पेलते. छगन भुजबळांनी शिवसेनेस रामराम ठोकल्यावर सुरेशभट जी हझल (गझल नव्हे!) लिहितात ती भर चौकात फ्लेक्सवर झळकते. मराठी कवितेला फ्लेक्सवर झळकवणारे एकमात्र कवी सुरेश भट! त्यांच्या कवितेस संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी चाली लावल्या. म्हणून ते बाळासाहेब ठाकरे यांच्या मर्जीतले मित्र! पण आपला हा मित्र घरी भेटायला येणार कळल्यावर सूचकपणे हिरवी टोपी घालून बसणारे सुरेश भट! याच सुरेश भटांचे गाणे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात शाहीर अमर शेखांनी आपल्या खड्या आवाजात गाऊन महाराष्ट्रभर पसरविले. आज महाराष्ट्र 'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी' म्हणत जे अभिमान गीत गातो आहे ते गीत ३५६ गायकांनी मिळून

वाचावे असे काही/२९