पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/29

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गझलसम्राट सुरेश भट आणि... - प्रदीप निफाडकर नंदिनी पब्लिशिंग हाऊस, सिंहगड रोड, पुणे - ४११०५१ पृ. २९६, मूल्य - ३५० रु. प्रकाशन - ११ जानेवारी, २०१७


गझलसम्राट सुरेश भट आणि...

 मराठी कवितेच्या प्रांतात ज्यांच्या सर्वच कवितांच्या ओळी अधोरेखित करण्याचा मोह रसिक वाचकास होतो, असे कवी म्हणजे गझलसम्राट सुरेश भट होत. माणसाच्या प्रत्येक प्रहरास साद देणारी कविता म्हणून सुरेश भटांची गाणी मराठी जिभेवर घोळत राहतात नि कानात त्यांची गूज नि गाज एकाच वेळी रुणझुणत, झणझणत राहाते. पहाटेला साखर झोपेची संज्ञा बहाल करणारी त्यांची कविता म्हणजे, 'पहाटे पहाटे मला जाग आली, तुझी रेशमाची गाठ सैल झाली!' सूर्योदयपूर्व काळ भूपाळीचा मानण्यात येतो. तेव्हा हीच कविता 'चल ऊठ रे मुकुंदा' म्हणून साऱ्या आसमंताला जागे करते, ती चांदण्यांच्या साक्षीने! सकाळ होताच ती 'गंजल्या ओठास माझ्या धार वज्राची मिळू दे!' म्हणून प्रार्थना करू लागते. तीच कविता सूर्य डोक्यावर आला की गर्जू लागते, 'नाही नाहत मला चांदणे, तळपे भानू डोईवरती... स्वतः पेटुनी पेटविणारा ज्वलंत मी तर एक निखारा' म्हणत ग्वाही देऊ लागते. सूर्य अस्ताला जाताना ती 'सूर्य केव्हाच अंधारला यार हो, या, नवा सूर्य आणू चला' म्हणून आश्वस्त करते. रात्र होताच ती कविता प्रणयिनी बनून आर्जवू लागते, 'मालवून टाक दीप, पेटवून अंग अंग.' नंतर कूस बदलून निद्रिस्त होणाऱ्या प्रियकरास 'तरुण आहे रात्र

वाचावे असे काही/२८