पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/26

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नियतकालिकात लेखनाची संधी मिळाली. 'स्टारडस्ट', 'सिनेबिझ', "फिल्मफेअर' मध्ये नट, नट्यांचे दिलकश फोटो, काढून ते छापायचे. पुढे ते लेख, मुलाखती लिहू लागले. बॉलिवूडमध्ये प्रघात होऊन गेला होता गौतम राजाध्यक्षांनी काढलेला फोटो छापून येईपर्यंत तुम्हाला कोणी नट, नटी मानणारच नाही. ही असते एका कलाकाराच्या कला साधनेची पावती. अशा काढलेल्या उत्कृष्ट छायाचित्रांचं एक इंग्रजी पुस्तक 'फेसेस' सन १९९७ मध्ये प्रकाशित झालं. ते पुस्तक ज्याच्याकडे तो प्रतिष्ठित मानला जाऊ लागला. निखिल वागळे त्यावेळी 'षटकार' नावाचं क्रिकेटला वाहिलेले मासिक चालवायचे. ते चांगलं चाललं तसं त्यांच्या मनात कल्पना आली की आपण चित्रपटावर आधारित मराठी मासिक चालवावं. 'चंदेरी' नाव ठरलं. पण मासिक क्लिक व्हायचं तर राजाध्यक्षांचे फोटो हवेत. 'मानसचित्र' नावाचं सदर सुरू करायचं ठरलं. फोटोसह लेख असं त्या सदरांचं स्वरूप होतं. या सदरातील चित्र व लेखांचा संग्रह म्हणजे 'चेहरे' पुस्तक होय. एकापेक्षा एक अप्रतिम चित्रांनी नटलेल्या या कॉफी टेबल बुकचं वैशिष्ट्य असं की यातली चित्रं वाचता येतात नि लेख पाहता येतात. मी तुम्हाला नुसते एक दोन किस्से सांगतो. गौतम राजाध्यक्षांच्या स्टुडिओमध्ये एकदा फोन घणघणतो. तो आलेला असतो बाँबे हाउसमधून. बाँबे हाउस म्हणजे टाटा उद्योग समूहाचं मुख्यालय. जे. आर. डी. टाटांचे 'की नोट' नावाचे आत्मचरित्र प्रकाशित होणार आहे. त्याच्या मुखपृष्ठावर तुम्ही काढलेला फोटो टाकायचे ठरलेय. यापूर्वी एका फोटोग्राफरने काढलेले फोटो जे. आर. डी. ना पसंत पडलेले नाहीत.' गौतम राजाध्यक्ष ऑफरनेच गलितगात्र होऊन नकार देतात. पण पलीकडून ऐकतील तर खरे! गौतम राजाध्यक्षांनी चौकशी केली की पूर्वीचे फोटो दाखवाल का? म्हणजे ते पाहून मला ठरवता येईल. त्यांनी फोटो पहिले नि नकाराचं कारण विचारलं तर सांगण्यात आलं की फोटोवरच्या सुरकुत्या जे. आर. डी. ना पसंत पडल्या नाहीत. गौतम राजाध्यक्षांनी काढलेले फोटो जे. आर. डी. ना पसंत पडले. त्यांनी काही केले नव्हते. कॅमेऱ्यास डिफ्यूज लेन्स बसवली. सुरकुत्या गायब. जे. आर. डी. फिट अँड फाईन!

 एकदा गौतम राजाध्यक्ष उटी, लव्हडेल, वेलिंग्टनच्या निलगिरी वनात भटकंतीसाठी गेले असताना वाटेत कुनुर नावाचे गाव लागले. त्यांना कळले की फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ इथं राहतात. फोटो काढायला मिळेल तर काय मज्जा येईल ना? वाटलं नि यश आलं. गंमत म्हणजे गौतम राजाध्यक्ष

वाचावे असे काही/२५