पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/23

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यांना कळायला लागल्यापासून दोनच कामे करतात. मे ते ऑक्टोबर अंक विषय निश्चित करणे, लेखकांना गाठणे, त्यांच्याकडून लिहून घेणे, जाहिराती मिळविणे व अंक वेळेत तयार करणे. नोव्हेंबर ते एप्रिल अंक वितरण, जाहिरात वसुली, अंकास ग्रंथरूप देणे. असा त्यांचा ऋतू आणि रंग एकच, तो म्हणजे दिवाळी. आहे की नाही गंमत? कोणत्याही गोष्टीचा नावलौकिक लीलया कधीच होत नसतो. त्यामागे असतात माणसाचे कष्ट, चिकाटी, चिंतन!

 गुलजार अरुण शेवते यांना लेखन तर देतातच पण न विसरता दिवाळी भेटही देतात. सुशीलकुमार शिंदे त्यांच्या प्रत्येक अंकात लिहितात. मंगेश पाडगावकर - हा अरुण शेवते नावचा भन्नाट माणूस काही न करता (नोकरी वा अन्य उद्योग!) दिवाळी अंक एके दिवाळी अंक जगतो म्हणून... सांस्कृतिक, सामाजिक कार्य करतो म्हणून, मानधन घेणे नाकारतात, विठाबाई नारायणगावकर अंगात फणफणता ताप असताना फडाफड फडातल्या रात्री जाग्या करते, यमुनाबाई वाईकर तासभर बोलून टेप बंद होता लक्षात आल्यावर आनमान न करता परत 'वन्समोर' बोलत राहतात. हे सर्व अशक्य ते शक्य होते शेवतेंच्या सायासामुळे, जिद्द, चिकाटीमुळे.

 एकदा अरुण शेवते, ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र गुहा यांचा एक लेख वाचत होते. वाचताना त्यांच्या लक्षात आले की महात्मा गांधी एकदा परीक्षेत नापास झाले होते. झालं, दिवाळी अंकाचा विषय ठरला, 'नापास मुलांची गोष्ट' (२००४). कोणकोण नापास विद्यार्थी मिळाले माहीत आहे? - इंदिरा गांधी, आइन्स्टाइन, जे. कृष्णमूर्ती, आर. के. लक्ष्मण, गुलजार, सुशीलकुमार शिंदे, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, डॉ. नरेंद्र जाधव, अमिताभ बच्चन, व्ही. शांताराम, दादा कोंडके, नेल्सन मंडेला, डॉ. अनिल अवचट, डॉ. अच्युत गोडबोले, अभिनेते गणपत पाटील, डॉ. श्रीराम लागू, किशोरी आमोणकर या थोरामोठ्यांची यादी वाचून आता मला 'मीपण नापास झालो होतो' हे सांगायला लाज वाटत नाही. माणूस मोठा होण्याची बहुधा ही पूर्वअट असावी.

 ऐवज'मध्ये मैत्र जीवाचे, सहजीवन, मला उमगलेली स्त्री, माझं घर,मी व माझे मद्यपान, एकच मुलगी (ज्यांना एक मुलगी झाली तरी ज्यांनी दुसरे अपत्य जन्माला घातले नाही अशांची आत्मकथने), सिनेमाचे दिवस, रंगल्या रात्री, स्वप्नी जे देखिले, प्रेमस्वरूप आई, मनातला पाऊस, नातेसंबंध, वृक्षवल्ली आम्हा सोयरे, अविस्मरणीय दिवस, माझं जगणं, माझी भूमिका'

वाचावे असे काही/२२