पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/22

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तो पहिला-वहिला अंक माझ्या संग्रही आहेच. शिवाय 'मौज' मासिकाच्या सन १९२४ चा दिवाळी अंकही. वृत्तपत्रे, नियतकालिकांचे पहिले अंक म्हणजे आपला सांस्कृतिक ठेवा, 'ऐवज'च ना! संगीतात ठेवणीतल्या रागदारीस 'चीजा' म्हटले जाते. असे किती ऐवज, चीजा मजकडे आहेत म्हणून सांगू? दैनिक केसरी पहिला अंक (मंगळवार, तारीख ११ जानेवारी, १८८१), दैनिक मराठा पहिला अंक (गुरुवार, १५ नोव्हेंबर १९३३), साप्ताहिक सोबत पहिला अंक (मे, १९६६), माणूस मासिक पहिला अंक (जून, १९६१) असे कितीतरी. शिवाय हे दिवाळी अंक विशिष्ट काळानंतर आपल्या अंकातील निवडक साहित्याचे विशेष अंक, संस्मरणीय ग्रंथ प्रकाशित करीत असतात. असे 'निवडक अबकडई' (रौप्यमहोत्सवी-२०१२), 'श्री दीपलक्ष्मी क्लासिक्स' (निवडक - १९५८ ते २०००), 'ऐवज' (ऋतुरंग दिवाळी - १९९३ ते २००९) ही माझ्या संग्रही आहेत.

 खरे तर या सर्वच अंकांबद्दल लिहायला हवे. पण आज मी फक्त 'ऐवज'बद्दलच तुम्हाला सांगायचे ठरवले आहे. 'ऋतुरंग' दिवाळी अंक मराठी दिवाळी अंक परंपरेत सन १९९३ मध्ये दाखल झाला. त्याचे संपादक आहेत अरुण शेवते. मूळ कवी मनाचा हा मित्र मनुष्य वेल्हाळ म्हणून जगप्रसिद्ध आहे. थोरामोठ्यांशी मैत्र हा याचा छंद. त्यांनी व्यक्तिचित्र, नाटक, लेख लिहिले तरी त्यांचा मूळ पिंड संपादकाचाच. 'हाती ज्यांच्या शून्य होते', 'नापास मुलांची गोष्ट', 'मद्य नव्हे मंतरलेले पाणी', 'रंगल्या रात्री', 'मला उमगलेली स्त्री' ही त्यांच्या दिवाळी अंकांची नंतर झालेली पुस्तके. त्यांचा प्रत्येक दिवाळी अंक नंतर ग्रंथ म्हणून प्रकाशित होतो. कारण तो एका विषयावर अनेकांना लिहिते करतो. ही अरुणची किमया। अरुण शेवते यांनी कुणाकुणाला लिहिले केले सांगू? अमृता प्रितम, सोनिया गांधी, एम्.एफ. हुसेन, गुलजार, बेगम परवीन सुलताना, यमुनाबाई वाईकर, विठाबाई नारायणगावकर, दीप्ती नवल, किशोरी आमोणकर, सुशीलकुमार शिंदे, बाबासाहेब पुरंदरे, ना. धों. महानोर, डॉ. रघुनाथ माशेलकर, शबाना आझमी आणि कित्येक. 'मराठीत लिहिलेले भारतीय सेलेब्रेटी' अशी सूची कुणाला तयार करायची तर ऋतुरंग दिवाळी १९९३ ते २०१७ ची नुसती अनुक्रमणिका डोळ्याखाली घातली तर सूची तयार!

 'ऋतुरंग'चा ऐवज' ग्रंथ (२०१०) म्हणजे महाराष्ट्राच्या जडणघडणीतील समाजकारण, साहित्य, संस्कृती, कला, संगीत, राजकारण, पत्रकारिता इ.क्षेत्रांतील मान्यवरांच्या निवडक आत्मकथनांचा संग्रह होय. अरूण शेवते

वाचावे असे काही/२१