पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/17

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आजाद बचपन की ओर - कैलास सत्यार्थी प्रभात प्रकाशन, ४/१९, असफ अली मार्ग, नवी दिल्ली - ११०००२, प्रकाशन- २०१६ पृ. २४०, मूल्य रु. ४५०/- _____________________________________________________

आजाद बचपन की ओर

 बालमजूर मुक्तीच्या जागतिक कार्याची नोंद घेऊन देण्यात आलेल्या सन २०१४ च्या शांततेच्या नोबेल पुरस्काराचे प्रशस्ती पत्र चोरीला गेल्याची बातमी वाचली नि मन विषण्ण झाले. २००४ साली तर कवींद्र, रवींद्रनाथ टागोरांचे मूळ नोबेल पदकच चोरीस गेले होते. भारतीय चोरांना सोन्या-नाण्यापेक्षा नोबेल महत्त्वाचे वाटते ही भारतीय चोरांची प्रगल्भताच म्हणायला हवी. कैलाश सत्यार्थी; यांचं एक सुंदर हिंदी पुस्तक आहे. 'आजाद बचपन की ओर' हे पुस्तक आहे लेखसंग्रह, पण मुलांच्या स्वातंत्र्याची गाथा म्हणून ते वाचायला हवे. काही माणसं जन्मजातच मुळी जगण्याचं उद्दिष्ट घेऊन येतात. बाळ कैलास शाळेत जाताना एक दृश्य नेहमी पाहात असे. एक चांभार जोडे शिवत बसलेला असायचा. त्याच्या शेजारी त्याचा मुलगापण तेच काम करायचा. आपल्याएवढा मुलगा असून तो शाळेत का येत नाही? या प्रश्नाने शाळकरी कैलासला भंडावून सोडले होते. त्याने आपल्या गुरुजींना विचारून पाहिले, पण त्याला समाधानकारक उत्तर काही मिळाले नाही. म्हणून तो सरळ त्या चांभाराकडेच गेला नि त्याला थेट विचारले की, तुम्ही तुमच्या मुलाला शाळेत का पाठवत नाही? चांभार बाबा म्हणाले, "खरंतर हा प्रश्न कधीच कुणी मला केला नाही आणि खरं सांगू का? मलाही कधी

वाचावे असे काही/१६