पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/163

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लिहायला लावतो तर त्याचं लेखन प्रमाण हे गौरवीकरण मला सकारात्मकता वा उदार जीवनव्यवहार म्हणून अनुकरणीय वाटते. चुकांच्या छिद्रान्वेषणापेक्षा मला आशय समृद्धी अधिक महत्त्वाची!

 या लेखनाने वर्षभर मला वाचकांशी जोडले. गेल्या वर्षभराचा शुक्रवार माझ्यासाठी कोल्हापुरी शुक्रवार ठरला. आठ वाजले की फोन घणघणत राहायचा. कधी कधी तर भल्या पहाटेही! संजय कांबळे या वाचकाचे चाळीस फोन या सदराचा मी गौरव समजतो. 'सगळ्या बिया खडकावर नसतात पडत' हा आशावाद या लेखनाने दृढ केला. माझे अनेक वाचक येऊन भेटत बोलत. त्यापेक्षा पुस्तक विक्रेते मोठ्या पुस्तकांबद्दल लिहीत ती त्या आठवड्यात आणून वाचकांना पुरवत. ग्रंथालयातील लिपिक काऊंटरवर ती पुस्तके काढून ठेवत कारण चोखंदळ वाचक ते मागणार हे ठरलेलं असायचं ते पूर्वानुभवाने.

 यापेक्षाही माझ्या या सदर लेखनाचा मला मिळालेला ब्रह्मानंद म्हणजे मी ज्या लेखकांच्या पुस्तकांबद्दल लिहिले, वाचक, मित्र, प्रकाशक, नातेवाईक त्या लेखकांना 'वॉट्सअप' करून पाठवत. मग मला साक्षात लेखकांचेच फोन, संदेश, मेल येत. हे 'लई भारी' वाटायचे! इंद्रजित भालेराव, शरद गोगटे, डॉ. रमेश जाधव असे काही फोन आठवतात.

 सदर लेखनाने मला चतुरस्र समृद्ध केले. मी काही जुनी वाचलेली पुस्तके लिहायचे म्हणून परत हाती घेतली. त्यांनी मला परत वाचताना नवा प्रकाश दाखवला. नव्या पुस्तकांनी नवं जग दाखवलं. नवी क्षेत्रे, नवी दुःखं तशीच काही आश्चर्यमिश्रित जीवने उमगली. उदाहरणच द्यायचे तर अरुण शौरींचं 'कळेल का त्याला आईचे मन?' ते वाचताना दिव्यांग अपत्यास वाढवणं पालकांच्या लेखी काय दिव्य असतं हे नव्यानं समजलं. 'प्रसिद्ध व्यक्तियों के प्रेमपत्र' पुस्तकाने मला अनुवादाची, अनुरचनेची प्रेरणा दिली. लेखन कामाठी असो वा वाचन कामाठी ती तुम्हास नित्य नवं देते म्हणून जग नित्य नूतन घडत राहतं.

 हे लेखन संग्रहित रूपात 'वाचावे असे काही' याच शीर्षकाने 'अक्षर दालन' मार्फत पुस्तकाकार होत आहे. ही देखील या सदराचीच फलनिष्पत्ती म्हणायची. जगात अशा सदरातून अनेक गोष्टी घडत असतात. वर्षश्रेष्ठ वाचक, लेखक, ग्रंथ, समीक्षा असे पुरस्कार जाहीर होत असतात. वाचनाने जग बदलते, फिरते ते असे. मी अनेक मासिके, दैनिकांतून स्तंभ लेखन केले. या स्तंभलेखनाने मला अधिक प्रतिसादित अनुभूती दिली. त्याचं

वाचावे असे काही/१६२