पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/162

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

रोज भटकायची ठिकाणे आहेत. तिथे रोज नवे लेखक, वाचक भेटतात. एकमेकांशी बोलतात. ब्लॉग, ट्विट, मेल, कॉमेंट, लाइकच्या माध्यमातून इथे माझ्यासारखे पुस्तक समीक्षकही नियमित असतात. त्यांची पुस्तक परीक्षणे, मुलाखती प्रसिद्ध होत असतात. 'गुडरिडर'वर मी या महिन्याची एमिली मे या समीक्षिकेची मुलाखत वाचली. ती सात वर्षे अ‍ॅमॅझॉनच्या 'गुडरिडर'ची समीक्षक आहे. गेल्या सात वर्षांत तिने १३०० पुस्तकांची परीक्षणे लिहिली. म्हणजे वर्षाला दोनशे. मी तर फक्त ४०च लिहू शकलो. प्रश्न तुलनेचा नसून आपल्या वाचन, लेखन गतीचा आहे. जगाची वाचन, लेखन गती आपल्या पाच पट आहे. तिचं मुलाखतीतलं पहिलंच वाक्य आहे, 'I don't remember ever not reading.' मी वाचत नाही असा काळ मला आठवत नाही. यावरूनही नित्य वाचनाचे महत्त्व अधोरेखित होते. 'प्रसंगी अखंडित वाचित जावे', 'आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने' या ओळी जोवर आपल्या दैनंदिन जीवनाचा परिपाठ होणार नाही, तोवर वाचन संस्कृती रुजणार नाही.

 वाचावे असे काही' मध्ये मी नव्या-जुन्या ज्या ४० पुस्तकांवर लिहिले ती पुस्तके 'हटके' पद्धतीची होती. ती व्यवच्छेदक अशा अर्थाने होती की तिचं समाजमूल्य मी महत्त्वाचं मानलं होतं. पुस्तक प्रकार म्हणाल तर कथा, कादंबरी, काव्य, नाटक, चरित्र, आठवणी, वैचारिक, समीक्षा, पत्र, माहिती,चित्रमय, गौरवग्रंथ, तत्त्वज्ञान, अनुभव, आत्मचरित्र सर्वांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. सर्वच लेखक प्रसिद्ध नव्हते. डॉ. दिलीप शिंदे, अशोक जाधव यांच्यासारखे नवशिके परंतु समाजाला नवं शिकवणारे होते. कैलाश सत्यार्थी, अरुण शौरी, तसलिमा नसरीन असे जगप्रसिद्ध एकीकडे तर

दुसरीकडे सुरेश भट, इंद्रजीत भालेराव, अरुणा ढेरे, असे एकदम प्रादेशिकपण.भाषा म्हणाल तर त्रिभाषा सूत्र वापरले. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील उत्कृष्ट ग्रंथाबद्दल लिहून वाचन परीघ रुंदावण्याचा, खोल करण्याचा तसेच तो बहुकोणी होईल असे पाहिले. हे सर्व मात्र मी हेतृतः केलं नाही. ते घडून आलं. वाचन हा माझा नित्य छंद असल्याने काही जुनं वाचलेलं आठवलं ते लिहिलं. जे नवं वाचताना लिहायलाच हवं असं आतून वाटलं, लिहिलं गेलं. 'लोकमत'च्या संपादकांचे आभार अशासाठी की त्यांनी मी लिहिलेलं जसंच्या तसं कानामात्रा, वेलांटी न बदलता छापलं. गमतीची गोष्ट अशी की अनवधानाने माझा एखादा चुकीचा गेलेला शब्दही त्यांनी इमाने इतबारे चुकीचा छापला. त्याचं कारण लेखक सन्मान. आपण प्रथितयश लेखकास

वाचावे असे काही/१६१