पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/155

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अभिजाततेकडे अग्रेसर होत आहे असे म्हणावयाला फारसा वस्तुनिष्ठ वाव प्रत्ययास येत नाही. जागतिकीकरण, माहिती व तंत्रज्ञान यांच्या पार्श्वभूमीवर मराठी ज्ञानभाषा म्हणून समृद्ध होते असे म्हणणे धाडसाचे ठरावे. कारण मराठीचा इंटरनेट, वेब, सॉफ्टवेअर इत्यादी रूपातील वावर नि वापर अन्य भाषांच्या तुलनेने अल्प आहे. मराठी साहित्यिकांची संकेतस्थळे नसणे, मराठी साहित्यिकांची माहिती विकिपिडीयावर सुमार स्वरूपात असणे, मराठी वेब मासिके अपवाद असणे ही वानगी म्हणून सांगता येतील. मराठी साहित्य संमेलन अध्यक्षांच्या भाषणात जागतिकीकरणानंतर जी सजगता दिसायला हवी होती, तिचा अभाव हे आपल्या साहित्य, भाषाविषयक कासव गतीचेच निदर्शक नव्हे काय?

 या पार्श्वभूमीवर आपण जेव्हा 'शतकाची विचारशैली' (खंड - ४) मधील भाषणे वाचू लागतो तेव्हा लक्षात येते की एकविसाव्या शतकातील १७ भाषणे इंग्रजीमुळे मराठीच्या पिछेहाटीच्या भयगंडाने ग्रासलेली आहेत. भाषा वाचायची असेल तर तिच्यात दैनंदिन व्यवहार होणे, शिक्षण होणे, ती माध्यमांची भाषा होणे ही पूर्वअट असते. लेखनाचा क्रम त्यानंतरचा. ललित साहित्य कलात्मक असते. ती एक तार्किक, कल्पनात्मक निर्मिती असते. वैचारिक आणि वास्तववादी साहित्य दाहक असते. ते जीवनोपयोगी असते. पण कल्पितात जी सर्जनात्मकता असते तिला पायबंद होत राहण्यातून नवनिर्मितीक्षमतेचा क्षय वा लोप हे वर्तमान मराठी भाषा व साहित्यापुढचे खरे आव्हान आहे, त्याची फारशी चर्चा चौथ्या खंडातील भाषणात होताना दिसत नाही. उल्लेख म्हणजे उपाय चर्चा नव्हे. यासाठी जे साहित्यिक पर्यावरण लागते त्याचा अभाव आपल्या चिंतेचा विषय व्हावा. मराठी प्रकाशक कविता संग्रह, नाटके प्रकाशित करण्यास नाखूष असतात. कथा, कादंबऱ्यांपेक्षा कविता नि नाटक हे साहित्य प्रकार प्रतिभेच्या अंगाने सरस असतात, हे कोण नाकारेल? ११ कोटी मराठी भाषिकांत १ कोटी लोकही वाचक बनत नसतील तर पूर्वी मराठी साहित्याची आवृत्ती १००० प्रतींची असायची, ती आता 'प्रिंट ऑन डिमांड' पद्धतीमुळे ५०० वर येऊन ठेपली आहे. मराठी अभिमान गीत गाणे अस्तित्व नि अस्मिता म्हणून जितके महत्त्वाचे तितकेच विकत घेऊन वाचणे महत्त्वाचे. 'पुस्तकाचा गाव' अनुकरणीयच. पण 'पुस्तकाचे घर' प्रत्येक घर बनणे तितकेच अनिवार्य ना? हे सारे 'शतकाची विचारशैली' खंड चारमधील 'वैचारिक सापळे' म्हणून दिलेला मजकूर आपणास समजावतो. नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष

वाचावे असे काही/१५४