पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/154

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संपन्न सतरा संमेलनाध्यक्षांच्या भाषणांवर विचार करण्यात आला आहे. समकालीन मराठी भाषा व साहित्य चिंतनाचे प्रतिबिंब म्हणून या अध्यक्षीय भाषणांचे मोठे महत्त्व असते. भाषा व संस्कृती संबंध, साहित्य व राजकारण, मराठी साहित्य परंपरा आणि इतिहास, मराठी भाषा शिक्षण व लोकव्यवहार, संमेलनांचे महत्त्व, अभिजात जागतिक साहित्यात मराठीचे स्थान, मराठी ज्ञानभाषा कशी होईल, शिक्षण माध्यम, शासन व साहित्य अशा अनेक विषयांवर या अध्यक्षीय भाषणांमधून खल होत आला आहे. सन १८७८ ते १९०७ पर्यंतच्या ५ संमेलनांची लिखित भाषणे उपलब्ध नसली, तरी सारसंक्षेपाने त्यांचे विचार उपलब्ध आहेत. लिखित भाषणे उपलब्ध असली, तरी ती बाजूला ठेवून अनेक अध्यक्षांनी त्या आधारे उत्स्फूर्त भाषणे केल्याचे दिसून येते. काही संमेलन अध्यक्षांची भाषणे उपलब्ध आहेत पण काही अपरिहार्य कारणांमुळे ती होऊ शकलेली नाहीत. उदाहरणार्थ, डॉ. आनंद यादव यांचे सन २००९ चे महाबळेश्वर संमेलन भाषण. अशा अंगानेही या भाषणांचा आपला असा इतिहास आहे.

 पहिल्या तीन खंडातील सुमारे पाऊणशे भाषणे वाचत असताना लक्षात येते की स्वातंत्र्यपूर्व काळातील अध्यक्षीय भाषणे मराठी भाषा व साहित्याची स्वप्ने पाहणारी आहेत. इंग्रजी साहित्यापासून प्रेरणा घेऊन आपले साहित्य सरस करण्याची धडपड यात दिसते. तसेच अनुवादापासून मुक्त होऊन स्वतंत्र, एतद्देशीय प्रश्न व समस्यांची उकल मराठी साहित्य कसे करेल याची चिंता वाहताना ती दिसतात. तद्वतच स्वातंत्र्योत्तर काळातील भाषणांमधून मराठी भाषा व साहित्यातील स्थित्यंतरांचे प्रतिबिंब आढळते. सुमारे दीडशे एक प्रश्नांचा उहापोह या भाषणांमधून झालेला आहे. सर्व भाषणे समकालीन भाषा, साहित्य, संस्कृती प्रश्नांची प्रतिक्रिया होत. आणिबाणीचा काळ असो वा वर्तमान असहिष्णुतेचा प्रश्न असो. साहित्यिक प्रतिक्रियात्मक असतात. पण विद्रोह अपवाद! यातून साहित्यिकांच्या प्रतिमेचा प्रत्यय येतो. मराठी भाषा व साहित्यात अल्पसंतुष्टता असल्याने ती भाषणे आत्मस्तुती व आत्मगौरवात अडकलेली आढळतात. त्यात 'आंतरभारती', 'विश्वभारती', 'विश्वसाहित्य' असे भान आढळत नाही. परिणामस्वरूपी मराठी भाषा व साहित्याचा दर्जा भारतीय साहित्यात काय आहे, याची कठोर चिकित्सा अभावाने दिसते. मराठी साहित्य हिंदी, इंग्रजी भाषांमध्ये अनुवादित होतात. या वा अन्य भारतीय भाषांतील साहित्यकृतींची भाषांतरे मराठीत होत असतात. पण त्यांच्या अभ्यासातून प्रयोगशीलतेद्वारे आपले मराठी साहित्य

वाचावे असे काही/१५३