पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/15

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बनून गेल्याने अथवा त्यांनी वाचनाचा अवकाश काबीज केल्याने माणसाचं सरासरी वाचन घटलं. वाचकाकडून अवाचक, अनपढ असा माणसाचा प्रवास चिंता नि चिंतनाचा विषय बनून गेला आहे. त्यातून 'वाचाल तर वाचाल' अशी इशारेबाजी ऐकू येऊ लागली. वाचन संस्कृती लोप पावत चालल्याची, वाचन गती मंदावल्याची खंत समाज शास्त्री, मानसशास्त्री यांना वाटू लागली आहे. भौतिक साधनांच्या सुकाळात बौद्धिक दुष्काळ ही खरोखरीच काळजीची गोष्ट बनून राहिली आहे. वाचन साधनांची समृद्धी होत असलेल्या काळात दरडोई पूर्वापार असलेला वाचन निर्देशांक कमी होतो आहे, हा कळीचा मुद्दा बनून पुढे आला आहे. ग्रंथालये, नाट्यगृहे, सिनेमागृहे ही आपली समाजशील संस्कार केंद्रे होती. त्यांचं ओस पडणं, त्यांना उतरती कळा येणं म्हणजे माणसाचा प्रवास समूहाकडून व्यक्तिगततेकडे वळणं होय. साहित्य, कला, क्रीडा यांचं आस्वादन सामूहिक होण्यातून मनुष्य समाजशील व समाजाभिमुख बनत असतो. ती प्रक्रियाच बंद पडण्याचा धोका व्यक्तीकेंद्रित जीवन शैलीतून उदभवला आहे. ललित साहित्याजागी जीवनोपयोगी, अनुभवजन्य साहित्य निर्मिती, अभिजात ग्रंथांची जागा आध्यात्मिक ग्रंथांनी घेणं यातून एक प्रकारची निराशा, एकांतता, आळस निरूद्देशता जन्म घेती झाली आहे. ही स्थितीशीलता सृजनास मारक ठरते आहे. भाषेचं सर्वनामी, संकोची, चित्ररूप होणं यातून पण सर्जनशीलता लोपते आहे. सुभाषितवजा, अनुप्रासिक, अलंकारिक भाषेची जागा इतिवृत्तात्मक, निवेदी, वर्णन शैलीने घेणं, ती वास्तववादी होणं यातूनही भाव, रस, अलंकार, छंद संपून काव्याजागी गद्य येणं म्हणजे भावहीन शब्द संभार म्हणजेच साहित्य होऊन बसले आहे. यातून माणसाची रसिकता सौंदर्य आस्वादकता लोपणं म्हणजे जीवन एकरस, एककल्ली, एकांगी होणं होय. वाचन संपण्याचं हे अरिष्ट नि अपत्य होय. माणसाचं यंत्र होणं दुसरं काय असतं? 'Books for leisure and books for pleasure' जगायचं तर वाचन वाचलं, जगलं पाहिजे.

टॉलस्टॉय म्हणाला होता, 'मला जीवनात तीनच गोष्टी महत्त्वाच्या वाटतात, त्या म्हणजे पुस्तकं, पुस्तकं आणि पुस्तकं.' वि. स. खांडेकर म्हणाले होते की 'ग्रंथालयात माझ्या पुस्तकांची लक्तरं झालेली पाहून माझ्यातला लेखक सुखावतो.' थोरो म्हणाला होता, 'कपडे जुने घाला, पुस्तके मात्र नवी वाचा.' या सर्वांनी वाचनाचं महत्त्व आपापल्या परीने विशद केले आहे. त्यावर आपण लक्ष केंद्रित करणे म्हणजे हरवलेल्या

वाचावे असे काही/१४