पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/148

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असा हट्ट धरतो. 'भीक, भंगार काय तुझा बाप गोळा करणार काय?' असा प्रतिप्रश्न करणारा जन्मदाता बाप पोराला बदाबदा बडवतो. पोरगं न बोलता मार खातं तसं न बोलता चोरून शिकत राहतं. शाळेपूर्वी व नंतरच्या वेळात भीक, भंगार गोळा करून बापाची भर करत राहतो. शाळेतले गुरुजी या पोराची हुशारी पाहून पदरमोड करून दफ्तर, गणवेश, फी भरतात. हा स्कॉलरशिप मिळवून हायस्कूल, कॉलेज, बी. एड्. करून शिक्षक होतो, तरी न ते गावाच्या गावी की घराच्या दारी. उपेक्षा, संघर्ष पाचवीला पुजलेला अशोक जात पंचायतीला विरोध करत स्वतःचं लग्न स्वतःच्या निवडीने व हिमतीने करतो म्हणून बहिष्कृत होतो.

 अशोक हिम्मत हरत नाही. जात पंचायतीच्या नाकावर टिच्चून बहिणीला डॉक्टर करतो. जात पंचायतीविरोधात कोर्टात जातो. जात पंचायत विरोधी कायदा होण्यापूर्वीच आपल्या हक्काची लढाई जिंकतो. समाजातील शिकलेला वर्ग अशोकच्या बाजूने उभा राहतो व जात पंचायत मोडीत काढून स्त्रियांना स्वातंत्र्य बहाल करतो. या समाजात स्त्री जन्मतःच पापी समजली जाते. नवरा मनाला येईल तेव्हा सोडचिठ्ठी देतो. जात पंचायत आपल्या मर्जीने तिचा 'धारूच्यो' करणार. म्हणजे तिच्याकडून (बापाकडून) दंड वसूल करणार नि तिचं लग्न दुसऱ्याशी करून देणार. हा पुनर्विवाह अधिकार जात पंचायतीचा. स्त्रीनं तो गुमान मानायचा. सांगेल त्याच्याशी सोयरीक करायची. जात पंचायतीचे पंच म्हणजे 'पंच परमेश्वर'. ते कोणाही स्त्रीस संशय, पैसे (लाच) इ. मुळे 'उभायत' ठरवतात. उभायत ठरवल्या गेलेल्या स्त्रीच्या गळ्यात नवऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र राहतं, पण ती नवऱ्याची राहात नाही. नवरा तिला नांदवत नाही. ती विवाहित विधवा जिणं जगते. ती आकर्षक दिसू नये म्हणून तिनं दातवण लावून सक्तीने आपले दात आपल्या हाताने काळे करायचे. या नि अशा अनेक डागण्या तिला दिल्या जातात, ते वाचताना हा महाराष्ट्र, भारत स्वतंत्र आहे यावर नि इथे कायदा, व्यवस्था, सामाजिक न्याय, मानव अधिकार, समता आहे यावर विश्वासच बसत नाही.

 भंगारची भाषा गोसावी समाजाची. हिंदी, मारवाडी, राजस्थानी, गुजरातीचा तिच्यात मेळ. कारण हा सारा मेळा या प्रांतातून भटकत इथे आलेला. थारो, मारो, खारो अशा ओकारांत क्रियांची ही भाषा बंजारा समाज असण्याची खूण. शिव्या-शाप, शौर्य-क्रौर्य, दुःख-दारिद्रय साऱ्याला छेद-भेद देत अशोक जाधव राधानगरी, करवीर, हातकणंगले अशा शाळात

वाचावे असे काही/१४७